नवी दिल्ली : कुतूब मिनारमध्ये असलेल्या दोन प्राचीन गणेशमूर्ती हलवण्याबाबत राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाने (NMA) भारतीय पुरातत्त्व खात्याला पत्र पाठवले आहे. या गणेशमूर्ती राष्ट्रीय संग्रहालयात नेण्यात याव्यात, अशी सूचना राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे प्रमुख तरुण विजय यांनी केली आहे. यानंतर मोदी सरकार याबाबत वेगाने कारवाई करत आहे. अनेक वर्षांपासून इथे असलेल्या या दोन गणेशमूर्ती लवकरच इतरत्र स्थलांतरित केल्या जाण्याची शक्यता आहे.
इतिहास
बाराव्या शतकात मोहम्मद घोरीने दिल्लीचा शासक नेमलेल्या कुतुबुद्दीन ऐबक याने कुतूब मिनार बांधले. ऐबकाने कुतूब मिनारच्या परिसरातील २७ मंदिरांची तोडफोड करून नवी वास्तू उभारली. त्याच ठिकाणी तेव्हापासून या दोन गणेशमूर्ती आहेत. या मूर्तींची पूजा करू द्या, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. यासंदर्भात करण्यात आलेल्या पत्रव्यवहारात या ठिकाणी मूर्ती ठेवणे हे अवमानकारक आहे, असे प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. याबाबत पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
भाजपाचे नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार व राष्ट्रीय स्मारक प्राधिकरणाचे प्रमुख तरुण विजय यांनी असे पत्र पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणालेत, ‘मी या ठिकाणी अनेक वेळा गेलो आहे. तेथे मूर्ती ठेवल्या जाणे हे अवमानकारक आहे. कारण, या मूर्ती मशिदीला भेट देण्यासाठी येणाऱ्यांच्या पायाजवळ आहेत. ’ असा आक्षेप त्यांनी घेतला. दरम्यान, युनोस्कोने १९९३ साली कुतूब मिनारला जागतिक वारसास्थळाचा दर्जा देऊ केला होता.
कुतूब मिनार परिसरात असणाऱ्या या गणेशमूर्तींना अनुक्रमे ‘उल्टा गणेश’ आणि ‘पिंजरे में गणेश’ म्हणतात. यापैकी एक मूर्ती कुव्वत उल इस्लाम मशिदीच्या दक्षिणेच्या भिंतीवर आहे. ‘पिंजरे में गणेश’ मूर्ती याच मशिदीचा भाग असून जमिनीला अगदी लागून आहे. त्यामुळे लोक मशिदीत प्रवेश करतात तेव्हा ही मूर्ती अगदी त्यांच्या पायाजवळ असते.