मुंबई : कोरोनाची लाट ओसरल्यामुळे आता महापालिका आणि स्थानिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आयाराम गयारामांची एंट्री सुरू झाली आहे. अशातच प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादीची वाट निवडली आहे. आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतील प्रदेश कार्यालयात त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
आसावरी यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘स्वाभिमान: शोध अस्तित्त्वाचा’ या मालिकेत भूमिका साकारत आहेत. चित्रपटसृष्टी, कलाकार आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे आसावरी जोशी यांनी सांगितले. मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अत्यंत गांभीर्याने आणि संवेदनशीलपणे कलाकार, लोककलाकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मला राष्ट्रवादी हा पर्याय योग्य वाटतो, असे त्या म्हणाल्या.
त्याचप्रमाणे पक्षातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कलाविश्वातील प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी काम करेन. माझ्यावर जो विश्वास टाकण्यात आलाय, तो मी नक्की पूर्ण करेन. मी एकच ठरवून आले की, राजकारणात आले असले तरी राजकारण न करता काम करेन, असे आसावरी जोशी यावेळी म्हणाल्या. आगामी पुणे महापालिका निवडणुकीत आसावरी जोशी यांच्यावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
