जळगाव ः प्रतिनिधी
महापालिकेला कधी नव्हे एवढा निधी मिळाला आहे. त्यातून रस्त्यांची व गटारींची कामे करताना गुणवत्तेवर भर देणे अपेक्षित आहे. मक्तेदाराची दलाली करण्यापेक्षा आपल्या जबाबदारीचे भान ठेवा. रस्त्यांच्या गुणवत्तेविषयी तक्रारी वाढत असून, त्यात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, अशा शब्दात महापौर जयश्रीताई महाजन यांनी अभियंत्यांची कानउघाडणी केली. कामे सुरू न करणाऱ्या मक्तेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना केल्या.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गेल्या वर्षी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 61 कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीतून शहरातील रस्त्यांची व गटारींची कामे केली जात आहेत; परंतु त्यासंदर्भात तक्रारी सुरू झाल्या आहेत. त्याची दखल घेत महापौर महाजन यांनी काल दुपारी सार्वजनिक बांधकाम व पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या वेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेता सुनिल महाजन, उपायुक्त श्याम गोसावी, शहर अभियंता विलास सोनवणी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता गोपाळ लुले यांच्यासह अभियंते उपस्थित होते.
या वेळी 168 कामांचा आढावा घेण्यात आला. त्यात 72 कामे पूर्ण झाल्याचे तर 72 कामे प्रगतिपथावर असल्याचा आढावा देण्यात आला. शहरातील बरेच कामे चार महिने उलटली तरी सुरू झालेली नाहीत. अनेक कामांची गती अत्यंत संथ आहे. अशाच प्रकारे गती राहिल्यास पावसाळ्यापूर्वी कामे कशी पूर्ण होतील असा सवाल केला. रस्त्यांच्या कामाविषयी नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. विकास कामांसाठी कोट्यवधी रूपये खर्च होत असताना गुणवत्तेची कामे होणार नसतील तर निधी खर्चाला काय अर्थ अशा शब्दात खडसावले.
वेतन कोणाचे घेतात मनपाचे की मक्तेदाराचे
निधी मिळवून कामे मंजूर करण्याची कामे पदाधिकाऱ्यांची असतात.ती गुणवत्तापूर्ण करून घेण्याचे काम अभियंत्यांचे आहे; परंतु अनेक मक्तेदार हे मनपाच्या हितापेक्षा मक्तेदाराचे हित जोपासतात. मक्तेदारांच्या दबावाखाली काम करत विकासाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली. आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. मिळणाऱ्या वेतनाची परतफेड योग्य पद्धतीने करा. आपण मनपाचे वेतन घेतात की मक्तेदाराचे असा सवालही त्यांनी केला. 22 कामे अजूनही सुरू न झाल्याने नाराजी व्यक्त केली. अशा मक्तेदाराला पाच वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले.
निकृष्ट दर्जाच्या सिमेंटचा वापर
शहरात काँक्रीटचे रस्ते व गटारींची कामे सुरू आहेत. यात निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरल्याची माहिती शहर अभियंता सोनवणी यांनी बैठकीत दिली. मक्तेदाराला यासंदर्भात नोटीस बजावून सिमेंट बदलण्याचे आदेश दिले. बुधवारी रेल्वेस्थानक परिसरातील रस्त्यांची पाहणी केली आहे.आता दररोज शहरातील रस्त्यांची पाहणी करणार असल्याचे सांगितले. पाहणीदरम्यान आमदार राजूमामा भोळे, विरोधी पक्षनेते सुन्लि महाजन, कंत्राटदार अभिषेक पाटील उपस्थित होते.