नवी दिल्ली : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या सुरू असलेल्या कारवायांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. आणि अशातच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी घेऊन सुमारे २० ते २५ मिनिटे चर्चा केली. या भेटीत नेमकी कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली याची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरून या भेटीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. पवारांनी अचानक मोदींची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चेला पेव फुटले हे नक्की.
राज्यात गेल्या मागील महिन्यांपासून आघाडी सरकारच्या नेत्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून चौकश्यांच्या ससेमिरा लागल्या आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलेलं आहे. या पार्श्वभूमीवर मोदी आणि पवारांची भेट अत्यंत मानली जात आहे. मात्र, या धाडसत्रावर दोन्ही नेत्यांच्या भेटीत चर्चा झाली की नाही याबाबतची माहिती मिळू शकली नाही.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीत आहेत. आज त्यांनी अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आज भाजपचाही स्थापना दिवस आहे. त्यामुळे मोदी सकाळी स्थापना दिनाच्या कार्यक्रमात व्यस्त होते. त्यानंतर दुपारी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड जवळपास २० ते २५ मिनिटे चर्चा झाली. या भेटीत शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राज्यातील राजकीय घडामोडींबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. मात्र, त्याला कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
दरम्यान, महाराष्ट्रातील खासदार आणि आमदार काल दिल्लीत आले होते. अभ्यास वर्गासाठी हे आमदार दिल्लीत आले होते. महाराष्ट्रातील या आमदार, खासदारांसाठी सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे चहापानाचा कार्यक्रम होता. तर रात्री शरद पवार यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पवारांनी या सर्व आमदारांशी संवाद साधला. याप्रसंगी भाजपचे नेते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी संजय राऊत यांनी आमदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. राऊत यांच्याकडे माईक येताच भाजपच्या आमदारांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला होता. काल महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदारांशी संवाद साधल्यानंतर आज पवारांनी मोदींची भेट घेतल्याने या भेटीचे अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत.
दरम्यान, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या भेटीकडे राजकीय दृष्टीने पाहू नये असे म्हटले आहे. नितीन गडकरी हे देखील शरद पवारांच्या निवासस्थानी भोजनाला उपस्थित होते. आज शरद पवार आणि मोदींची भेट झाली. पण यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. हा एका राजकीय परंपरेचा भाग आहे. विचारांचे मतभेद असले तरी मनभेद असण्याची गरज नाही. शब्दांचा योग्य उपयोग, एकमेकाचा सन्मान करताना योग्य क्षणी भाव व्यक्त करणं हा यामागचा भाग आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. त्यांच्यात काही राजकीय किवा महाराष्ट्राबद्दल चर्चा झाली का हे सांगणं सध्या शक्य नाही, कारण भाजपला महाविकास आघडीचे सरकार पाडण्यात कुठलाही रस नाही. २०२४मध्ये महाराष्ट्रात भाजपची एकहाती सत्ता आणण्याचा संकल्प आम्ही केला असल्याचेही ते म्हणाले.