नाम फाउंडेशनतर्फे आत्महत्याग्रस्त 195 कुटुंबांना 49 लाखांची मदत

0
32

 जळगाव ः  प्रतिनिधी  
चित्रपट अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनतर्फे जळगाव जिल्ह्यातील 195 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी 25 हजार रुपये सानुग्रह अनुदानाचा धनादेश वितरण कार्यक्रम गणपतीनगरात रोटरी हॉल येथे झाला.
जैन उद्योगसमूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, उद्योजक रजनीकांत कोठारी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, नाम फाउंडेशनचे जळगाव विभागाचे समन्वयक डॉ.प्रताप जाधव, संजय शहा यांच्याहस्ते हे धनादेश वितरित झाले.
‘नाम’तर्फे जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शेतकरी हिताचे कार्यक्रम राबवले जातात. त्यात प्रामुख्याने नदी व नाले रुंदीकरण, खोलीकरण कामाचा समावेश आहे. डॉ. प्रताप जाधव यांनी प्रास्ताविक केले. धनादेश उपलब्धतेसाठी हरीश इथापे यांचे सहकार्य लाभले. धनादेशासोबत स्व. प्रेमजी भवानजी शहा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गव्हाचे पीठ देण्यात आले. डॉ. नंदन माहेश्वरी, दिलीप गांधी, सुनिल शहा, संगीता पाटील, पुरुषोत्तम टावरी, शशी बियाणी, वर्धमान भंडारी, विरेंद्र छाजेड, प्रणव मेहता, डॉ. राहुल भंसाळी, विजय लाठी, वल्लभ अग्रवाल, मितेश शहा, जयेश लापसिया, संजय जैन या वेळी उपस्थित होते.
       संकटांना धैर्याने सामोरे जा : अशोक जैन
अध्यक्षीय भाषणात अशोक जैन म्हणाले  की, शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत खचू नये. संकटांना धैर्याने सामोरे जाऊन त्यावर मात करावी. नाम फाउंडेशनतर्फे शेतकरी हितासाठी आलेल्या प्रत्येक प्रस्तावास मदत करण्यासाठी तत्पर आहोत. उद्योगपती रजनिकांत कोठारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here