जळगाव : प्रतिनिधी
रुग्णालयात असो वा शिबिरस्थळी आलेल्या गरजू रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करत शासनाच्या योजनांचा लाभ रुग्णांना मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असलेले डॉ.उल्हास पाटील रुग्णालयाचे रुग्णसेवेप्रतीचे कार्य महत्वपूर्ण ठरत असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मलकापूर व गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार, ३१ मार्च रोजी भव्य मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी खडसे बोलत होते.
मलकापूर येथील भ्रातृ मंडळ चाळीस बिघा येथे सकाळी शिबिरास प्रारंभ झाला. शिबिराचे उद्घाटन माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याहस्ते दिपप्रज्वलन व संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेस मार्ल्यापण करुन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आ. राजेश एकडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेते राधेश्याम चांडक, बुलढाणा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाजेरजी काझी, जिल्हाध्यक्ष अरविंद कोलते, मलकापूर कृउबा समिती उपमुख्य प्रशासक संतोष रायपुरे, नगराध्यक्ष अॅड हरिश रावळ, गोदावरी फाऊंडेशनचे सदस्य डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.गजानन पडघान, जिल्हाध्यक्ष महिला अनुजा सावळे, जिप उपाध्यक्षा मंगला रायपुरे यांच्या प्रमुख उपस्थीतीत उद्घाटन सोहळा पार पडला.
शिबिराचे महत्व पटवून देत त्याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. पुढे बोलतांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातर्फे देण्यात येत असलेल्या आरोग्य सेवेबद्दल गौरवोद्गार काढले. शिबिर आयोजन व यशस्वीतेसाठी मलकापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष बाळु पाटील, शहराध्यक्ष अरुण अग्रवाल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिरस्थळी शिबिरार्थींनी बुलढाणा येथील डॉ.गजानन पडघान यांच्यावतीने मोफत औषधींचे वाटप करण्यात आले तसेच आयोजकांतर्फे लाभार्थींना खिचडीचेही वाटप करण्यात आले.
रुग्णसेवेसाठी कटिबद्ध – डॉ.वैभव पाटील
मलकापूर ही माझी जन्मभूमी असून आज याठिकाणी गोदावरी फाऊंडेशनच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा उपक्रम आम्हाला घेता आला, त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो. तसेच आपणास कुठलीही आरोग्य समस्या आल्यास केव्हाही आपण डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात या किंवा मला फोन करा मी आपल्याला सर्वोतोपरी मदत करेल, आपण निरोगी आरोग्य जगावे यासाठी आमचे प्रयत्न असून रुग्णसेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत आपणही लाभ घ्यावा, असे आवाहन गोदावरी फाऊंडेशनचे सदस्य डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांनी केले.
४२४ जणांनी घेतला शिबिराचा लाभ
डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णसेवेसाठी आज मलकापूर येथे धाव घेतली. याप्रसंगी कान-नाक-घसा, मेडिसीन, सर्जरी, नेत्रविभाग, अस्थिरोग, स्त्रीरोग तज्ञांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी रुग्णांची मोफत ईसीजी, मधुमेह, टू डी इको तपासणी करण्यात आली, हृदयविकाराचा त्रास असलेल्यांसाठी टू डी इको तपासणी ही महत्वपूर्ण ठरली. शिबिरातून कान-नाक-घशाचे १८, मेडिसीनचे १८, सर्जरीचे ४, नेत्ररोगाचे ३१ आणि अस्थिरोगाचे १९ अशा एकू ८२ रुग्णांना पुढील उपचाराची आवश्यकता आहे, त्यासाठी ४ एप्रिल २०२२ रोजी रुग्णांना रुग्णालयात येण्याचा सल्ला दिला असून एकूणच ४२४ रुग्णांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरात अस्थिरोग तज्ञ डॉ.परिक्षीत पाटील, सर्जरीचे डॉ.श्रीयश सोनवणे, स्त्रीरोग डॉ.यशश्री देशमुख, कान-नाक-घशाचे डॉ.श्रृती खंडागळे, मेडिसीनचे डॉ.सुशिल लंगडे, नेत्ररोग डॉ.सिद्धी धिंग्रा यांनी रुग्णांची तपासणी केली असून त्यांना इंटर्न, नर्सिंग स्टाफ यांचे अनमोल सहकार्य लाभले. शिबिर यशस्वीतेसाठी रत्नशेखर जैन, गौरी जोशी, दिपक पाटील, तुषार सुरे आदिंनी सहकार्य केले.