जळगाव ः प्रतिनिधी
आपला देश सर्वधर्मसमभाव मानणारा, विविधतेने नटलेला, संस्कृतीने परिपूर्ण आहे. खुदाई खिदमदगार किंवा महाराष्ट्र गो विज्ञान समिती या संस्था संस्कृती टिकवण्याचे काम करत आहेत. आज गायींची दुरवस्था झालेली दिसते. गाईच्या जमिनीवर मानवाने अतिक्रमण केले आहे. गो मातेला तिची जमीन देऊन पूर्ववैभव प्राप्त करून देऊ, असे आवाहन हरिद्वारचे स्वामी सुशीलानंद यांनी केले.
जैन इरिगेशनची सेवाभावी संस्था भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन, गांधीतीर्थने पुरस्कृत 25व्या जमनाबेन लोकसेवक पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. मालेगाव येथील महाराष्ट्र गो विज्ञान समितीच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. खुदाई खिदमदगारचे फैसल खान, किरपालसिंह मंडलोई यांना स्वामी सुशीलानंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. रमेश दाणे अध्यक्षस्थानी होते तर डॉ. सुगन बरंठ उपस्थित होते.
भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाउंडेशन पुरस्कृत 51 हजार रुपये, मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रास्ताविक डॉ. सुगन बरंठ यांनी केले. रमेश दाणे
यांनीही विचार व्यक्त केले. किरपालसिंह यांनी खुदाई खिदमदगार कार्याची माहिती दिली. डॉ. साजिद अहमद, कमलाकर देसले यांनी उर्दूत अनुवादित गीताईची प्रत भेट दिली. सूत्रसंचालन डॉ. अपश्चिम बरंठ यांनी तर आभारप्रदर्शन वैद्य विजय कळमकर यांनी केले. कमलाकर देसले यांच्या पसायदानाने या कार्यक्रमाचा समारोप झाला.



