शहरासह जिल्ह्यात रंगली राजकीय धुळवड

0
78

जळगाव ः प्रतिनिधी
जिल्ह्यासह शहरात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड येत असते. यातच जिल्ह्याचे पालकमंत्र्यांसह आमदार, खासदार, नगरसेवकांनी आपापल्या गावात होळी सोबतच धुलिवंदन उत्साहात रंगून जात साजरे करून रंगीबेरंगी वातावरण निर्माण केले होते.
राज्यात विविध टोकाला गेलेले गचाळ राजकारण मात्र धुलिवंदनाने धुवून निघाले आहे. जळगाव जिल्ह्यासह शहरातील पालकमंत्र्यांसह विविध पक्षाचे नेते तसेच आमदार-खासदार, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या मतदार संघात नागरिकांना विविध रंगीबेरंगी लावून धुलिवंदनाची रंगत वाढविली.यामध्ये शिवसेनेची मुलुख मैदान तोफ तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथील निवासस्थानी होळीच्या दिवशी होळी दहन करून नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या तर खासदार उन्मेश पाटलांनी चाळीसगाव येथील निवासस्थानी नागरिकांसह परिवारासोबत रंगपंचमीचा आनंद लुटला.
शहराचे आ.राजुमामा भोळे यांनी धुलिवंदनाच्या दिवशी सकाळपासून विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात हजेरी लावून लहानग्यापासून ते ज्येष्ठासोबत धुलिवंदन साजरे केले.त्याचे फोटो  सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहे. तर शहराचे महापौर जयश्रीताई महाजन व माजी महापौर तथा नगरसेवक ललित कोल्हे यांनी धुलिवंदनाच्या दिवशी सकाळीच शहरातील नुतन मराठा महाविद्यालयातील मैदानावर रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक विष्णू भंगाळे यांनीही काव्यरत्नांवली चौकातील युवा सेनेच्या कार्यक्रमात धुलिवंदनाचा युवकांसोबत आनंद लुटून जल्लोष केला.
यावेळी कार्यक्रमात सर्वपक्षीय महिला पदाधिकाऱ्यांनी धुलिवंदनाचा उत्सव साजरा करीत त्यात भर घातली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या ॲड.रोहिणीताई खडसे – खेवलकर यांनीही मुक्ताईनगरातील निवासस्थानी धुलिवंदन साजरे केल्याचे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here