जळगाव – लाईफ इज ब्युटीफुल फाउंडेशन आयोजित, मल्हार हेल्प फेअर -४ हा सेवाकार्याचा मेळावा येत्या १२ ते १४ मार्च २०२२ दरम्यान सागर पार्क येथे संपन्न होणार असून त्यात या वर्षी नवीन संकल्पनांना समाविष्ट करण्यात आले आहे . स्वयंसेवी संस्थांच्या प्रदर्शनासोबतच या वर्षी शासकीय योजना, रोजगार मेळावा, खान्देशी खाद्य जत्रा, करमणूक आणि हॉबी डूबी डू हा विभाग तसेच विविध क्षेत्रातील सेवादूतांचा सत्कारही या सोहळ्यात करण्यात येणार आहे.
हेल्प फेअर हा असा सोहळा आहे जिथे विविध सेवाभावी संस्था , गरजवंत व दाते सगळे एकाच ठिकाणी एकत्र येत असतात. सेवाभावी संस्थांचे मनोबल वाढविणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे, त्यांना मदतीचा हात देणे यासोबतच समाजाला समाजऋण फेडण्याचे नवनवे मार्ग दाखविणे, विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, दातृत्व जगविणे, तरुण पिढीला सेवाकार्यात करियरच्या नवीन वाटा दाखविणे हि या आयोजनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. प्रामुख्याने याच हेतूने या सोहळ्याची मांडणी करण्यात आलेली आहे .
राज्यभरातील संस्थांचा समावेश :
स्थानिक लोकांना प्रेरणा मिळण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या सेवाभावी संस्थांना महाराष्ट्रातून हेल्प फेअर – ४ मध्ये आमंत्रित करण्यात आले असून त्यांत प्रामुख्याने मुंबई, पुणे , धुळे, नंदुरबार येथील संस्थांचा समावेश आहे.
शासकीय योजनांची माहिती व लाभ:
या वर्षी माननीय जिल्हाधिकारी श्री अभिजीतजी राऊत यांच्या पुढाकाराने उपयुक्त अशा शासकीय योजनांची माहिती येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे . त्यात सामाजिक, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण व कृषी विषयक योजनांचा समावेश असेल .
रोजगार मेळावा:
एन.टी.टी.एफ.च्या वतीने, भारत सरकारच्या ‘कमवा आणि शिका अभियाना’ अंतर्गत, रविवारी, दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान मल्हार हेल्प फेअरमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. आय.टी.आय. आणि इयत्ता बारावी विज्ञान उत्तीर्ण निवडक विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स, पुणे येथील प्रतिनिधी तीन वर्षासाठी कंपनीत समाशिष्ट करतील.
‘हॉबी डूबी डू’ विभाग :
विद्यार्थी मित्रांसाठी या वर्षी हेल्प फेअरमध्ये विविध विषयांवरील देखावे साकारण्यात येत आहेत . या माध्यमातून अपंग, अंध आणि गरीब -होतकरू मुलांच्या कलांचे सादरीकरण केले जाईल. मुलांतील सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी ‘हॉबी डूबी डू’ या विशेष विभागाचे समायोजन येथे करण्यात आले आहे, ज्यात स्पोर्ट्स , डान्स, आर्ट , म्युझिक यासारख्या छंद वर्गांचे स्टॉल्स लावण्यात येतील.
दोन दिवसीय कार्यशाळा :
दर वर्षाप्रमाणेच हेल्प फेअरमध्ये सेवा संस्थांच्या मार्गदर्शन आणि उत्थानासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन १३ आणि १४ मार्चला, दुपारी १ ते ५ वाजेदरम्यान हॉटेल कोझी कॉटेजमध्ये करण्यात आले आहे . या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी कोल्हापुवरच्या श्रीमती कांचनताई परूळेकर आणि सर्जना मेडिया, मुंबईचे श्री मिलिंद आरोळकर यांना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे.
सेवामहर्षी आणि सेवादूत पुरस्कार वितरण सोहळा :
दर वर्षाप्रमाणेच या सोहळ्यात उत्कृष्ट सेवाभावी संस्थांना पुरस्कृत करून सन्मानित करण्यात येणार आहे. विविध स्तरांवर, समाजात नि:स्वार्थ भावनेने सेवाव्रत असलेल्या सेवा महर्षींनादेखील सन्मानित करण्यात येणार असून शहरातील ५ स्वच्छता कर्मचाऱ्यांना ‘स्वच्छतादूत’ हा पुरस्कार वितरित केला जाणार आहे. मान्यवरांची व्याख्यानेही दररोज असतील.
खान्देशी खाद्यपदार्थांची जत्रा :
बचत गटांना उत्पन्न मिळावे आणि प्रदर्शनात आलेल्यांना जत्रेची मजा चाखता यावी, यासाठी हेल्प फेअरमध्ये विविध बचत गटांचे, खान्देशी पदार्थांचे स्टॉल्सही लावले जातील. करमणुकीसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी तीनही दिवस असेल.
कुटुंबातील प्रत्येकाला सेवाभावी संस्थांच्या कार्याशी जोडण्याचा प्रयत्न :
प्रत्येक स्टॉलवर आपण त्या संस्थेच्या कार्याशी कसे जुळू शकतो, पैशा शिवायही आपण त्यांना काय देऊ शकतो, याबाबतची माहिती मिळेल. जेणेकरून प्रत्येक नागरिक त्यांचे आवडते कार्य करणाऱ्या संस्थेशी आपल्या परिस्थितीनुसार जुडू शकेल. आणि या योगे एक आनंदाची, समाधानाची अनुभूती मिळवेल. जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनात यावे आणि एका वेगळ्या आनंदाची अनुभूती घ्यावी, असे हेल्प फेअर टीम चे श्री. भरतदादा अमळकर, श्री. प्रकाश चौबे, श्री. गनी मेमन, श्री. नंदू अडवाणी, श्री. अमर कुकरेजा, श्री. चंद्रशेखर नेवे, श्री. प्रशांत मल्हारा व श्री. आनंद मल्हारा यांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.