लखनौः वृत्तसंस्था
साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे कल हाती आले असून, सध्या तरी भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. भाजप तब्बल दोनशे पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर समाजवादी पक्षाने आतापर्यंत शतकी खेळी केल्याचे समोर येतेय. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रचारात उपस्थिती लावली. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्त्वात समाजवादी पक्ष आणि आरएलडीने निवडणूक लढवली आहे.
भाजपची जादूचा आकडा पार
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत. येथे बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला 202 जागांची गरज आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. आता साडेनऊपर्यंत आलेल्या कलानुसार भाजपने जादूचा आकडा गाठत 202 जागांवर आघाडी घेतल्याचे समोर येत आहे. समाजवादी पक्षाने शतकी खेळी पूर्ण केली आहे. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये जवळपास शंभर जागांचे अंतर असल्याचे प्राथमिक कलामध्ये दिसत आहे. सध्या आलेल्या कलानुसार बहुजन समाजवादी पक्ष, काँग्रेसला अजूनही दुहेरी आकडाही गाठता आला नाही. दुपारपर्यंत हे चित्र स्पष्ट होईल.
भाजपमध्ये उत्साह
मतमोजणीच्या कलामध्ये भाजप आघाडीवर असल्याचे सध्या दिसते आहे. ते पाहता भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याचे दिसत आहे. भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी विजयाचे पोस्टर आणि झेंडे लावायला सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांनी आतापासूनच जल्लोषाची तयारी सुरू केलीय. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हा मोदी यांचा करिष्मा असल्याची प्रतिक्रिया टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिलीय. मात्र, हे कल असून, खरे चित्र दुपारपर्यंत निकाल हाती आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
सपा आशावादी
अखिलेश यादव यांनी आज सकाळी 8 वाजून 41 मिनिटांनी ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी एक शेर ट्वीट केलाय. त्यात ते म्हणतायत की, इम्तिहान बाकी है अभी हौसलों का, वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का. यानंतर त्यांनी आपले कार्यकर्ते, समर्थक, नेते, पदाधिकारी, शुभेच्छुक यांना मनापासून धन्यवाद दिलेत. या साऱ्यांनी समाजवादी पक्ष आणि आघाडीचे खूप चांगले काम केले. मतदान केंद्रावर रात्रंदिवस दक्ष राहिले, याबद्दल त्यांनी आभारही मानले आहेत. शिवाय लोकशाहीच्या सैनिकाचे विजयाचे प्रमाणपत्रही घेऊनच यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.