चोपडा : संदीप ओली
चोपडा विधानसभा मतदारसंघांतर्गत समावेश असलेल्या यावल तालुक्यातील मनुदेवी, आडगाव तसेच चोपडा तालुक्यातील चांदसनी येथील काळभैरव देवस्थान मंदिराचा नाशिक विभागांतर्गत राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत (सन 2021-22) पर्यटन विकास व्हावा, यासाठी राज्य शासनाने पाच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे.
यासंदर्भात राज्य शासनातर्फे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे अवर सचिव र. ज. कदम यांनी दिलेला आदेश जळगाव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांना नुकताच (11 फेब्रुवारी 2022) प्राप्त झाला. त्यामुळे मनुदेवी, आडगाव तसेच चोपडा तालुक्यातील चांदसनी येथील काळभैरव देवस्थान मंदिराचा पर्यटनस्थळ विकास होण्याचा मार्ग सुकर बनला आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पाठविलेला प्रस्ताव व त्या अनुषंगाने चोपड्याच्या आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी वेळोवेळी केलेल्या अथक प्रयत्नांना यश आले आहे.
आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे यावल तालुक्यातील मनुदेवी, आडगाव तसेच चोपडा तालुक्यातील चांदसनी येथील काळभैरव देवस्थान मंदिराचा पर्यटनस्थळ विकास व्हावा, या अनुषंगाने आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडे यासंदर्भातील प्रस्ताव व त्याला लागणार्या सर्व बाबींची कागदोपत्री पूर्तता त्या-त्या वेळी प्राधान्याने केली. तसेच शासन दरबारीही मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे, राज्याचे पर्यटन व सांस्कृतिक विकासमंत्री ना.आदित्यजी ठाकरे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांच्याकडे सातत्याने अथक परिश्रम घेऊन पाठपुरावा सुरू ठेवला. त्यांनीही यासाठी प्राधान्याने सहकार्याची भूमिका घेतली. त्यामुळे या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीतून कम्युनिटी हॉल, प्रसाधनगृह, सस्पेन्शन ब्रीज, पगोडा, वॉच टॉवर, ट्रेकिंग रोड, सेल्फी पॉर्इंट, रोडसाईड बांबू प्लांटेशन, लॅन्डस्कॅपिंग, चिल्ड्रन पार्क, स्टॅच्यू ॲण्ड स्क्ल्पचर्स आणि इतर सोयी-सुविधांयुक्त पर्यटन विकासकामे होणार आहेत. तसेच चोपडा तालुक्यातील चांदसनी येथील काळभैरव देवस्थान मंदिराच्या सभामंडप उभारणीच्या कामासाठी 50 लाखांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आलेला आहे. दरम्यान, मतदारसंघातील पर्यटनस्थळ विकासासाठी निधी मंजूर करण्यात आलेल्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, पर्यटन व सांस्कृतिक विकासमंत्री व पालकमंत्र्यांसह ज्यांनी-ज्यांनी यासाठी सहकार्य केले त्यांचे मनस्वी आभार मानले आहेत.
चोपडा विधानसभा मतदारसंघातील विविध गावांतील रस्ते, जोडरस्ते तसेच राज्य शासनाच्या पेयजल योजनेंतर्गत कार्यारंभ आदेश झालेली दीडशे कोटींची व प्रस्तावित दीडशे कोटींची अशी एकूण तीनशे कोटींची कामे मंजूर आहेत. ही कामे झाल्यानंतर मतदारसंघातील भविष्यातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, अशी माहिती आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी दिली.