चक्क! उस्मानाबादेत जन्मले राष्ट्रपती आणि पंतप्रधान

0
20

उस्मानाबादः प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यातील एका घरात राष्ट्रपती आणि पंतप्रधान जन्मले, हे ऐकून काही खटकलं असेल. चौधरी कुटुंबियांच्या या घराला या नावांची सवय झाली आहे. उमरगा तालुक्यातील चिंचोली गावात अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रपती जन्मले आणि सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान. आता राष्ट्रपती आणि पंतप्रधान नेमके कोण, असा प्रश्न पडला असेल तर ते विशिष्ट नाव असलेले राष्ट्रपती किंवा पंतप्रधान नाही तर मुलांना या पदांचीच नावं देण्यात आली आहे. या दोन मुलांचे बाबा व्यवसायाने शिक्षक आहेत. लोकशाहीवर त्यांचा गाढा विश्वास आहे. त्यामुळे आपल्या मुलांची नावं पंतप्रधान आणि राष्ट्रपतीच ठेवणार, असा त्यांचा आग्रह होता. अखेर कायदेशीर लढाई लढल्यानंतर त्यांनी मुलांची नावं अशी ठेवली.
उमरगा तालुक्यातील चिंचोली गावातील दत्ता चौधरी हे व्यवसायाने शिक्षक आहेत. भारताच्या लोकशाहीवर त्यांचे अत्यंत प्रेम असून तिच्याप्रती आदर म्हणून आपण काहीतरी करावे, असे त्यांना वाटते. त्यामुळेच आपल्या मुलांची नावं राष्ट्रपती आणि पंतप्रधान ठेवण्याचा विचार त्यांच्या मनात आला.
मुलांची नावं राष्ट्रपती आणि पंतप्रधान ठेवण्यात दत्ता चौधरी यांना बऱ्याच अडचणी आल्या. जन्माचा दाखला या नावाने मिळण्यासाठी प्रशासनानेही कायद्याच्या अडचणी सांगितल्या. अखेर त्या सर्वांवर मात करत, दत्ता चौधरी यांनी या नावांची परवानगी मिळवली.
चौधरी कुटुंबातील हे राष्ट्रपती अडीच वर्षांचे अन् पंतप्रधान सहा महिन्यांचे आहेत. दत्ता यांच्या हट्टापायी घरातील कुटुंबियांनीही मुलांचं थाटात बारसं केलं आणि मुलांचं नाव पंतप्रधान आणि राष्ट्रपती ठेवलं. आता चौधरी कुटुंबियांच्या एकाच घरात राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोठे होतायत. या दोघांनाही मोठेपणी राष्ट्रपती आणि पंतप्रधान करण्याचं दत्ता चौधरी यांचं स्वप्न आहे. मोठेपणी ही मुलं नक्की कर्तबगार होतील, अशी आशा करुयात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here