चाळीसगाव : प्रतिनीधी
काही दिवसांपूर्वी चाळीसगाव तालुक्यातील पोहरे येथील केशव राघो महाजन यांच्या घराला गॅस लिकेजमुळे लागलेल्या आगीत घरातील रोख रक्कम जवळपास ७ लाख ७० हजार रुपये व घरातील स्त्रियांचे दागिने जळुन खाक झाले होते. या दुर्दैवी घटनेने केशव महाजन यांनी आयुष्यभर कष्ट करून उभा केलेल्या संसाराची राख झाली. तालुक्याचे आ. मंगेश चव्हाण यांना याबाबत कळताच त्यांनी गावातील भाजपा कार्यकर्त्यांकडून याबाबत माहिती घेतली होती व लवकरच सदर कुटुंबाला भेट देण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानुसार आमदार मंगेश चव्हाण यांनी पोहरे येथे केशव राघो महाजन यांची भेट घेतली व झालेल्या नुकसानीची पाहणी केली. झालेले नुकसान पाहून व ग्रामस्थांनी मांडलेली व्यथा पाहून आमदार मंगेश चव्हाण यांचे संवेदनशील मन हळहळले. त्यावेळी त्यांनी केशव राघो महाजन यांना ५० हजार रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले तसेच आगीत अर्धवट जळालेल्या नोटा मी स्वतः रिझर्व्ह बँक मुंबई येथे घेऊन बदलवून आणेल असे आश्वस्त केले.
यावेळी पोहरे गावाचे सरपंच काकासाहेब माळी, भाजपा बुथप्रमुख पंजाबराव अहिरराव, भाजपा गटपालक प्रमोद पाटील, मोहन जाने, नाना साबळे, महारु महाजन, गोकुळ माळी, प्रकाश बागुल, सुरेश महाजन, राजू माळी, रावसाहेब माळी, सोमनाथ माळी, रामदास जाने आदी उपस्थित होते.
जात – पात – पक्ष भेद विसरून संपूर्ण पोहरे गाव एकवटले…
केशव महाजन यांच्या कुटुंबावर आलेली दुर्दैवी वेळ पाहून संपूर्ण तालुका हळहळला, गावात सर्वांशी चांगले संबंध असलेल्या केशव महाजन व त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी देखील पूर्ण पोहरे गाव उभे राहिले, जात पात गट तट पक्ष भेद साऱ्या भिंती गळून पडल्या. गावातील लहान मुलांनी आपल्या खाऊ साठी असणारे ५० रुपये यापासून ते गावातील प्रत्येक घरातुन यथाशक्ती अशी मदत दिली व या कुटुंबाला सावरले. मात्र नुकसानच प्रचंड झालेले असल्याने अजूनही त्यांना मदतीची गरज आहेच.