नेहरू युवा केंद्राच्या राज्यस्तरीय युवा संसदमध्ये अक्षता, सोनिया, करणने मारली बाजी

0
14

जळगाव : प्रतिनीधी
केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगावला यंदा राज्यस्तरीय युवा संसदचे आयोजन करण्याचा मान मिळाला होता. आयएमआर महाविद्यालयाच्या सौजन्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील ७२ स्पर्धकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदविला. राष्ट्रहिताच्या विषयांवर वक्तृत्व सादर करीत अनेकांनी उपस्थितांची मने जिंकली. राज्यातील अक्षता देशपांडे, सोनिया मिश्रा आणि करण पारीख या तीन स्पर्धकांची निवड झाली असून ते दिल्ली येथील राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
नेहरू युवा केंद्राच्या राज्यस्तरीय युवा संसदचे आयोजन महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे संचालक प्रकाशकुमार मनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयएमआर महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते. युवा संसद उदघाटन कार्यक्रम अध्यक्षस्थानी खा.उन्मेष पाटील हे होते. प्रसंगी व्यासपीठावर विधान परिषदेचे माजी सभापती डॉ.अरुणभाई गुजराथी, आ.संजय सावकारे, आ.सुरेश भोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, आयएमआर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शिल्पा बेंडाळे, नेहरू युवा केंद्राचे संचालक प्रकाशकुमार मनुरे, जळगावचे युवा अधिकारी नरेंद्र डागर आदी उपस्थित होते. तर समारोप समारंभाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत हे अध्यक्षस्थानी होते. परीक्षक म्हणून परीक्षक डॉ.उमेश गोगडीया, डॉ.राधेश्याम चौधरी, रामचंद्र पाटील, डॉ.मनोज गोविंदवार, प्राचार्य एस. व्ही.कुलकर्णी यांनी काम पाहिले.
युवा संसदचे अध्यक्ष खा.उन्मेष पाटील म्हणाले की, युवकांचे नेतृत्व विकसित करण्याचे काम अशाच कार्यक्रमातून होत असते, अद्याप तरी त्यावर काही औषध आलेले नाही. पुरस्कार हा महत्वाचा नसून सहभाग महत्वाचा आहे. आपल्यातील गुण, इच्छा, आकांशा, मर्यादा याची माहिती आपल्याला कार्यक्रमात सहभागी झाल्यावर कळतात. हजारो पुस्तक वाचल्यावर जे ज्ञान आपल्याला मिळणार नाही ते ज्ञान आजच्या कार्यक्रमात आपल्याला मिळेल, असे खा.उन्मेष पाटील यांनी सांगितले.
विधान परिषदेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी म्हणाले की, ध्येयहीन असाल तर तुम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळे जीवनात ध्येय निश्चित करा. माझ्यावर कितीही मोठे संकट आले तरी मी त्याचा सामना करेल अशी प्रार्थना देवाला करा. आत्मविश्वास कायम मजबूत असायला हवा. स्वतःचा आत्मविश्वास महत्वाचा आहे. आपण चांगले असू तर जग आपल्याला चांगले दिसेल. शिक्षणासोबत संस्कार देखील महत्वाचे आहे, असे ते म्हणाले.
युवा संसदच्या समारोप कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानाहून बोलताना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की, युवा संसद म्हणजे आपल्यासाठी एक संधी असते. जेव्हा तुम्ही आपले वक्तृत्व सादर करतात तेव्हा त्यात काय चुका आहेत आणि त्यात काय सुधारणा करायला हवी हे समजते. आपण त्यातून बोध घेत आपले विचार, वक्तृत्व अधिक चांगले करतो. आज मिळालेल्या या संधीचा फायदा करून घेतल्यास तुमच्यापैकी एखादा उद्या समाजाचे प्रतिनिधित्व करू शकतो, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर विजयी स्पर्धकांच्या नावाची त्यांनी घोषणा केली.
युवा संसदेत नाशिक येथील अक्षता देशपांडे, ठाणे येथील सोनिया मिश्रा आणि अमरावती येथील करण पारीख यांनी बाजी मारली. नवीदिल्ली येथे दि.७ आणि ८ मार्च रोजी होणाऱ्या राष्ट्रीय युवा संसदेत ते महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करतील.
उदघाटन समारंभात माजी मंत्री आ.संजय सावकारे, आ.सुरेश भोळे, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, केसीईच्या शिल्पा बेंडाळे, डी.टी.पाटील आदिंसह मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. दिवसभरात ७२ स्पर्धकांनी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, संकल्प से सिद्धी, एक भारत श्रेष्ठ भारत, मेक इन इंडिया, खेलो इंडिया, फिट इंडिया, स्टार्ट अप इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया या विषयावर आपले वक्तृत्व सादर केले.
उपक्रमासाठी धुळे युवा अधिकारी अशोक मेघवाल, नाशिकचे सुनील पंजे, प्रा.शमा सराफ, तंत्रज्ञान सहाय्यक रेवार्थ गोविंदवार, प्रणिलसिंग चौधरी, योगी संस्थेच्या सदस्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे लेखापाल अजिंक्य गवळी, स्वयंसेवक रोहन अवचारे, गौरव वैद्य, मुकेश भालेराव, हेतल पाटील, धुळे येथील स्वयंसेवक मनोज पाटील, ललित पाटील आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here