मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या माजगाव येथील निवासस्थानी शुक्रवारी सकाळी प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीमधील डर्टी डझन म्हणत भ्रष्ट नेत्यांविरोधात आम्ही पुरावे तपास यंत्रणांना देणार असल्याचे म्हटले. याच साऱ्या घडामोडींवरुन शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे. शिवसेनेने भाजपाची तुलना तालिबानशी केली आहे. भाजपाने भ्रष्टाचाराविरोधात बोलणे म्हणजे तालिबानने रशियाला शांततेसाठी आवाहन करण्यासारखे असल्याचा टोला शिवसेनेने लगावला आहे.
“भारतीय जनता पक्षाने म्हणे भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारले आहे. रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू आहे हे सगळ्यांना माहीत आहे, पण भाजपानेही युद्ध पुकारले आहे. तेही भ्रष्टाचाराविरुद्ध! केंद्रीय तपास यंत्रणांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईस हे लोक युद्ध वगैरे म्हणत असतील तर ते मूर्खपणाचे लक्षण आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या ‘आड’ लपून हे लोक युद्धाचा आव आणीत आहेत. हा शिखंडी प्रयोग आहे,” असा टोला शिवसेनेने ‘सामना’च्या ‘शिखंडीचे युद्ध’ या मथळ्याखाली लिहिलेल्या अग्रलेखातून लगावला आहे.
“मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणांचे पथक पोहोचले. त्यांना जो तपास करायचा तो करतील, पण भ्रष्टाचाराविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्यांना एक आठवण करून द्यायची आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भाजपा स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना महापालिकेतच लाखो रुपयांची लाच स्वीकारताना अटक झाली व आठवडाभर जेल भोगून ते पुन्हा स्थायी समितीचा पुढला भ्रष्टाचार करण्यासाठी रुजू झाले. यावर भाजपावाले तोंड का उचकटत नाहीत? पुण्याचे महापौर मोहोळ यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा थक्क करणाऱ्या आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड मनपातील स्मार्ट सिटी घोटाळा ही जनतेच्या पैशांची लूट असून भाजपाचेच लोक त्या लुटीचे भागीदार आहेत,” असे म्हणत शिवसेनेने पुण्यामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपाला डिवचले आहे.
