मॉस्को : वृत्तसंस्था:रशियन अंतराळ संस्था रॉसकोमोसच्या प्रमुखांनी युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकने लादलेल्या निर्बंधांचा परिणाम आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनसंदर्भातील कामांवर होऊ शकतो असे म्हटले आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियावर लादलेल्या नव्या निर्बंधांचा परिणाम रशिया करत असलेल्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनबाबत सहकार्य काढून घेण्यापर्यंत जाऊ शकतो असे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर चार अमेरिकन, दोन रशियन आणि एक जर्मन अंतराळवीर वास्तव्यास आहेत.
रॉसकोमोसचे प्रमुख दिमित्रि रोगोजिन यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात इशारा देताना भारताचही उल्लेख केला आहे.“जर तुम्ही आमच्यासोबतच्या सहकार्यावर निर्बंध आणले तर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनला वाटेल त्या भ्रमणकक्षेत फिरण्यापासून कोण वाचवणार. ते अमेरिका किंवा युरोपमध्ये पडणार नाही का?”, असा प्रश्न दिमित्रि रोगोजिन यांनी उपस्थित केला आहे. अमेरिकने निर्बंध लादल्यानंतर लगेच दिमित्रि रोगोजिन यांनी हे ट्विट केले आहे .
“त्याचप्रमाणे 500 टन (5 लाख किलो) वजनाची ही वस्तू भारत किंवा चीनवर पाडण्याचाही पर्याय आहे. तुम्हाला या शक्यतेने त्यांना धमकवायचे आहे का? आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन रशियावरुन जात नाही, त्यामुळे सर्व धोका तुम्हालाच आहे. तुम्ही त्यासाठी तयार आहात का?,” असेही दिमित्रि रोगोजिन यांनी विचारले आहे.
त्यानंतर दिमित्रि रोगोजिन यांनी अमेरिकेला एक मैत्रीपूर्ण सल्ला देताना अशाप्रकारे बेजबाबदारपणे वागू नये असे म्हटले आहे. अमेरिकेने जारी केलेल्या नव्या निर्बंधांमध्ये माहिती तंत्रज्ञानासंदर्भातील निर्यात कमी करण्याचे ठरवण्यात आले आहे. यामुळे रशियाला लष्करी आणि अंतराळ क्षेत्रामध्ये काम करण्यास अडचणी निर्माण होतील असे अंदाज बायडेन यांनी व्यक्त केला आहे.
