पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत आणि हे दर कमी होण्याचे नावच घेत नाहीत. त्यातच एखादे वाहन सांभाळणे आता कठीण होऊन बसले आहे. महिनाभर गाडी चालवल्याने आता लोकांच्या खिशाला मोठा फटका बसू लागला असून इंधनाच्या वाढलेल्या किमतींमुळे वाहनचालकही वैतागले आहेत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण आज अशा काही टिप्स जाणून घेऊया, ज्यांच्या मदतीने तुम्ही एका महिन्यात बरेच पेट्रोल वाचवू शकता आणि यामुळे तुमचे बजेट थोड्याफार प्रमाणात का होईना, पण नक्कीच सुधारेल
गाडीवर अनावश्यक वस्तू ठेवू नका
कारची रचना एयरोडायनामिक्स म्हणजेच वायुगतिशास्त्रानुसार केली गेली आहे, परंतु काही गोष्टी हवेच्या अचूक प्रवाहात अडथळा आणतात, ज्यामुळे कारवरील हवेचा दाब वाढतो. याचा सरळ अर्थ म्हणजे यामुळे गाडीचा मायलेज कमी होतो. तुमच्या कारच्या छतावरील बार, बॉक्स आणि ध्वज तुमच्या कारच्या एयरोडायनामिक्सवरील प्रभाव कमी करतात. अशा परिस्थितीत, अधिक चांगल्या मायलेजसाठी, कारमध्ये मायलेज कमी करणाऱ्या वस्तू ठेवू नका.
एसीचा वापर कमी करा
उन्हाळ्यात, आपल्या सर्वांना कारमध्ये एअर कंडिशनरची आवश्यकता असते. अशावेळी आपण एसी सतत चालू ठेवतो. शक्यतो गाडीची केबिन थंड झाल्यावर एसी बंद करा. ही युक्ती खूप प्रभावी आहे आणि त्यामुळे इंधनाची खूप बचत होते.
गरज असेल तितकेच पेट्रोल भरा
तुम्ही प्रत्येक वेळी पेट्रोल पंपावर गाडीची टाकी पूर्ण भरली तर नकळत तुम्ही गाडीवर अनावश्यक भार टाकत आहात. जर तुम्हाला तुमच्या कारमधून चांगले मायलेज हवे असेल, तर कारमध्ये आवश्यक तेवढे पेट्रोल भरा. यामुळे कारवर फक्त आवश्यक भार पडेल आणि मायलेजच्या बाबतीत तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळेल.
क्रूज कंट्रोलचा वापर करा
जर तुमच्या कार कंपनीने कारमध्ये क्रूज कंट्रोल फीचर दिले आहे तर त्याचा उपयोग करा. याचा वापर केल्याने कार एका निर्धारित वेगाने चालत राहील आणि यामुळे मायलेज सुधारेल. याशिवाय ड्रायव्हरलाही थोडा आराम मिळतो आणि या फीचरमुळे लांबचा प्रवास करताना पेट्रोलची बरीच बचत होते.