मुंबई : प्रतिनीधी
शिवसेनेने अग्रलेखात म्हटले की, नाझी भस्मासुराचा जसा उदय झाला तसा अंतही झाला हे सध्याच्या मस्तवाल राज्यकर्त्यांना लक्षात येऊ नये याचे आश्चर्य वाटते. केंद्रीय तपास यंत्रणा या नाझींच्या फौजांप्रमाणे काम करत आहेत. आपल्या राजकीय मालकांचे बेकादेशीर हुकूम मानत आहेत. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडी नावाच्या नाझी फौजा पोहचल्या. 2003 च्या एका प्रकरणात त्यांना अटक केली . 2003 मध्ये मलिक यांनी एक जमीन खरेदीचा व्यवहार केला होता. तो संबंध दाऊदशी जोडून त्यांच्यावर मनी लाँडरिंगपासून टेरर फंडिंग असे अनेक गुन्हे दाखल केले. असा हल्लाबोल शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर केला आहे.
राज्यात भाजपचं सरकार येऊ नये ही श्रींची इच्छा होती. 2024 ला केंद्रातून मोदी-शाह आणि त्यांच्या नाझी फौजांचं पतन व्हावं ही श्रीरामाचीच इच्छा दिसते. महाराष्ट्रात विकृत बेहोशीत तलवारी चालवणारे स्वतःच्याच तलवारीने घायाळ होतील. महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे हवेतील तलवारबाजीने पडणार नाही. कॅबिनेट मंत्र्यास कपटाने अडकवून लोकशाहीचा खून करण्यात आला आहे. नवाब मलिक हे अटकेनंतरही मूठ आवळून वर करत हसत बाहेर आले. त्यामुळे हिटलरच्या नाझी फौजांचा पराभव अटळ आहे, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर टीकास्त्र सोडले.
सत्य बोलणाऱ्याचा गळा घोटणं ही मर्दानगी नाही. हिंमत असेल तर पाकिस्तानात घुसून दाऊदला खतम करा, नाहीतर त्याला फरफटत भारतात घेऊन या. हे लोक बार्बाडोसमधून मेहुल चोक्सीला आणू शकले नाहीत तिथे दाऊदचे काय? केंद्रीय तपास यंत्रणांना आपलं गुलाम करून मनमानी सुरू आहे. राजकीय विरोधकांना नामोहरम केलं जातं आहे. महाराष्ट्रात शरद पवार आणि त्यांचं कुटुंब, उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब, संजय राऊत आणि त्यांचे कुटुंब, अनिल देशमुख, अनिल परब यांच्यावर बदनामी आणि खटल्यांची कैची लावून विकृत आनंद साजरा करणे हे कसले राजकारण? असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला.