जळगाव : प्रतिनीधी
येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित वाघनगर मधिल प्राथमिक शाळेत २३ फेब्रुवारी रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा “शुभेच्छा समारंभ” उत्साहात पार पडला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निळकंठ गायकवाड आणि गिरीश कुलकर्णी यांची उपस्थिती होती. त्यासोबतच व्यासपीठावर मुख्याध्यापक हेमराज पाटील, शालेय समिती प्रमुख रत्नाकर गोरे, प्रशासकीय अधिकारी दिनेश ठाकरे, महाविद्यालय समन्वयक उमेश इंगळे, सीबीएससी चे प्राचार्य गणेश पाटील, इंग्लिश मीडियम चे प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील, प्राचार्य किशोर पाठक, निवासी प्रमुख शशिकांत पाटील उपस्थित होते.
प्रमुख अतिथी निळकंठ गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून ‘नोकरी करणारे नाहीतर नोकरी देणारे बना’असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शिष्टाचाराचे पालन कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले. त्याचबरोबर माननीय गिरीश कुलकर्णी यांनी देखील विद्यार्थ्यांना ‘कसे जगावे सांगा ना, हसत हसत की कण्हत कण्हत’ या कवितेच्या ओळी तून जीवनातील एक मार्ग निश्चित करण्याचा त्याचबरोबर शाळेला आपल्या शिक्षकांना आणि परिवारातील सदस्यांना सोबत घेऊन जीवन प्रवास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख अतिथींचा परिचय पुनम खर्चाने यांनी करून दिला. तर स्वागत मुख्याध्यापक हेमराज पाटील यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाच्या समन्वयिका वैशाली पाटील यांनी केले.
प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या प्रवेशापासून तर आजपर्यंतच्या वाटचालीवर प्रकाश टाकण्यात आला. जुन्या आठवणींना उजाळा म्हणून त्या विद्यार्थ्यांचे जुने फोटोज स्लाईड स्वरूपात दाखवण्यात आले. दिया तडवी, अनुष्का काळे, नंदिनी सोनार आणि आयुष बडगुजर या विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातल्या गमतीजमती आठवणी मनोगत स्वरूपात व्यक्त केल्या.
पालकांमधून वासुदेव सोनार यांनी देखील विद्यार्थ्यांशी उत्तम संवाद साधला. दिवसातून किमान एक तास आपल्या कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून परिवारातील सदस्यांमध्ये जी पोकळी निर्माण होते आहे ती दूर करावी असे आवाहन केले. त्याचबरोबर शिक्षक श्रीराम लोखंडे व सचिन गायकवाड यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. मुख्याध्यापकांनी व सर्व शिक्षक बंधू भगिनीनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना जीवनातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मीना मोहकर यांनी केले.