विजय तेंडुलकर यांनी सुमारे 65 वर्षापूर्वी लिहिलेल्या ‘माणूस नावाचे बेट’ या पुस्तकावरुन त्या काळात रंगमंचावर नाटक सादर करण्यात आले.त्यात काशिनाथ घाणेकर या कसलेल्या अभिनेत्याने मुख्य भूमिका वठविली होती.रसिकांनी देखील त्याकाळी या नाटकाला डोक्यावर घेतले होते.तेच नाटक जळगावच्या केअर टेकर फाऊंडेशनने काल मराठी हौशी नाट्य स्पर्धेत संभाजीराजे नाट्यगृहाच्या रंगमंचावर सादर करण्याचे धाडस जळगावचे रंगकर्मी रमेश भोळे यांनी केले.विशेष म्हणजे हे आव्हान त्यांच्या समोर होते व त्यांनी ते आव्हान तितक्याच समर्थपणे पेलण्याचा कसोशीने प्रयत्न केला.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
रमेश भोळे दिग्दर्शित व ओम थिएटर निर्मित ‘माणूस नावाचे बेट’ या नाटकाने प्रारंभापासून ते शेवटपर्यंत रसिकांना खिळवून ठेवले.तीन अंकी नाटकाचा प्रत्येक अंक उत्कंठावर्धक ठरला.त्यात पहिल्या व तिसऱ्या अंकाने हे नाटक उंचीवर नेले त्यामुळे प्रेक्षकांनीही त्यास तितकाच प्रतिसाद दिला.मुख्य काशिनाथ उपाध्येच्या भूमिकेत दीपक भटने अक्षरशः जीव ओतला.काही प्रसंगात तर त्याने ज्या टाळ्या घेतल्या त्या त्याच्या अभिनयाची पावती ठरली तर त्यास स्वप्ना लिंबेकर-भट हिने सहचारिणी मालूच्या रुपात तेवढीच भक्कम साथ दिली.काही हलकेफुलके प्रसंग तिनेही सहज रंगविले व सत्य परिस्थिती समोर येताच आपल्या भुमिकेला त्यात गुंतवून घेतले हा बदल वाखणण्याजोगा. दीपक व स्वप्नाने जीवनातील बिकट परिस्थितीला सामोरे जातांना जो संघर्ष वठविला तो कमालीचा लाजबाब म्हणावा लागेल.या व्यतिरिक्त नितीन देशमुख (आप्पा),राहुल वंदना सुनिल (वसंता) यांनी देखील चांगली चुणुक दाखविली.सचिन कुलकर्णीचा काटदरे व किराणा मालवाला तसेच मंगेश कुळकर्णीचा धोबी प्रेक्षकांना भावून गेला.दिग्दर्शन करतांना रमेश भोळे यांनी विशेष मेहनत घेतल्याचे जाणवले.
जीवन संघर्षाची कथा
माणूस नावाचे बेट हे नेमकं काय आहे, असा प्रश्न प्रारंभी अनेक प्रेक्षकांना पडला होता मात्र जसजसे नाटक पुढे सरकत गेले तसातसा उलगडा होत जातो आणि शेवटच्या टप्प्यात त्याची उकल होते. मानवी नात्याचे अनेक पैलू उलगडतांना परिस्थितीसमोर मनुष्य हतबल होत असला तरी त्या परिस्थितीवर हिंमतीने मात करता येते हे उलगडते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करणाऱ्या काशिनाथ उपाध्येच्या जीवन संघर्षाची ही कथा प्रेक्षकांची मने जिंकून गेली.त्यात मालूने तेवढ्याच दमदारपणे साथ दिल्याने त्यात आणखीन भर पडली.दिखाऊ बाह्यजगावर प्रेम न करता माणसावर प्रेम करा व जीवनात आलेल्या संकटावर हसतखेळत मात करा असा मोलाचा संदेशही हे नाटक देऊन जाते.
तांत्रिक बाजूही भक्कम
ललित गायकवाड,सुभाष मराठे व यशश्री उगवे यांची रंगमंच व्यवस्था नाटकाच्या विषयाला साजेशी तर उज्वला पाटीलची रंगभूषा व स्वप्ना लिंबेकर-भटची वेशभूषा नाटकात रंग भरणारी ठरली.रमेश भोळे यांची प्रकाशयोजना ठिकठाक तर योगेश शिंदे यांचे नेपथ्थही कथेला पूरक ठरले.दर्शन गुजराथीने संगीताची बाजू उत्तम सांभाळली.सुनिल महाजन यांनी सादर केलेल्या या नाटकास अभिषेकदादा पाटील फाऊंडेशन,भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व श्रीनिवास टेंट हाऊसचे विशेष सहकार्य लाभले.एकंदरीत
माणूस नावाचे बेट ने सादरीकरणात जी उंची गाठण्याच्या दिशेने वाटचाल केली ती स्पर्धेतील रंगत वाढविणारी ठरली आहे.कोणतेही यश हे एकट्यादुकट्याचे नसते तर संपूर्ण टीमचे असते,याचा प्रत्यय काल नाटकाच्या सादरीकरणाने आणून दिला.त्यामुळे केअर टेकर फाऊंडेशनच्या टीमचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
चुरस वाढू लागली पण
जसजशी ही स्पर्धा पुढे सरकत आहे तसतशी या स्पर्धेतील चुरस वाढू लागली आहे.त्यामुळे आगामी सर्व नाटकांकडून रसिकांच्या अपेक्षा वाढणे स्वाभाविक आहे.त्यास आज …स्टे… मिळतो की आणखी वेगाने ही चुरस निर्माण होते हे स्पष्ट होईलच.