चाळीसगाव ः प्रतिनिधी
वर्षानुवर्षे प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटवून घेण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात दि.12 मार्च रोजी एकाच दिवशी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव यांनी दिली आहे.
महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार विधी सेवा समिती व वकील संघ, चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय लोकअदालत होईल. चाळीसगाव येथे न्यायालयाच्या आवारात तालुका विधी सेवा समिती, चाळीसगाव एन.के.वाळके यांच्या अध्यक्षतेखाली लोक अदालतीस प्रारंभ होईल. या लोक अदालतीसाठी चाळीसगाव तालुका वकील संघ, सर्व पोलीस निरीक्षक चाळीसगाव, तहसिलदार, तहसिल कार्यालय चाळीसगाव, गटविकास अधिकारी पंचायत समिती चाळीसगाव, मुख्याधिकारी नगरपालिका चाळीसगाव यांचे सहकार्य लाभणार आहे.
या लोकअदालतीत ट्रॅफिक चलान, धनादेश अनादर, वैवाहीक खटले, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले आदींचे व खटला दाखलपूर्व प्रकरणे तसेच एकूण ज्या खटल्यामध्ये कायद्याने तडजोड करता येते असे संपूर्ण फौजदारी खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.