सावदा ता. रावेर : प्रतिनिधी:राज्यकर्त्याकडून शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव दिला जात नसेल तर, किमान शेतमालाचे संरक्षण तरी करावे.अशी संतप्त प्रतिक्रिया सावदा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. रोझोदा येथील कामसिद्ध महाराज मंदिरावरती परिसरातील शेतकरी शेतमाल व शेत सामग्री चोरांच्या विरुद्ध शेतकरी मोठ्या प्रमाणात एकवटला होता.
यावेळी रोझोदा येथील रमेश महाजन, चिमण धांडे, मिलिंद वायकोळे, रवींद्र चौधरी, विजय महाजन, दीपक धांडे (रोझोदा उप सरपंच ) चीनवलं येथील गोपाळ नेमाडे, श्रीकांत महाजन, दामोदर महाजन, योगेश बोरोले, (चीनवलं सरपंच ) सावखेडा येथील प्रमोद महाजन, हेमंत महाजन, भागवत महाजन, नामदेव महाजन, हिरामण महाजन खिरोदा येथील किशोर चौधरी कोचूर येथील कमलाकर पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात परिसरातील शेतकरी उपस्थीत होते.
दरम्यान चीनावल येथील शेतकऱ्यांनी काही लोकांना शेतमालचोरी करत असल्याचे हटकल्याने उलट शिरजोरी करून शेती मालकालाच मारहाण करण्याचा दुर्दैवी प्रकार दि. 19 (शनिवार) रोजी घडला होता. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसात तक्रार दाखल केली म्हणून काही लोकांनी शेतकऱ्यांचे केळीच्या बागेतील घड कापून फेकले आहे. यामुळे परिसरात मोठी शेतकऱ्यामध्ये मोठी दहशत पसरली असून शेतकरी भयभीत झाले आहे.
आधीच अस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देणाऱ्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना आता मानव निर्मित संकटांचा ही सामना करावा लागत आहे. शिवजयंतीच्या पावन दिवशीच हा दुर्दैवी प्रकार घडल्याने राज्यात मोगलाई लागून गेली आहे की काय असा खडा सवाल सावदा पंचक्रोशीतील शेतकरी विचारू लागले आहे.
सावदा पोलीसांचे सोयिस्कररित्या दुर्लक्ष
परिसरात गेल्या तीन-चार महिन्यांपासून शेतकऱ्याच्या शेतमालाची व सामग्रीची मोठ्या प्रमाणात नासधूस करुन चोरी होत असून आहे. वेळोवेळी यंत्रणा व व्यवस्थेकडे तक्रारी करून देखील न्याय मिळत नसल्याने परिसरातील शेतकरी हतबल झाला आहे. मागील महिन्यात रणगाव, रायपूर, तासखेडा उधळी या भागातील मोटर पंप मोठ्या प्रमाणात चोरीचा प्रकार घडला होता. चिनावल, कोचुर बुद्रुक,कोचुर खुर्द सावखेडा, रोझोदा, खिरोदा कुंभारखेडा, सावखेडा या शेत शिवारातील शेतकऱ्यांचा पशूधन चोरी करणे, स्टार्टर फोडणे, केबल जाळणे, ठिबक सिंचन व पीव्हीसी पाईप ची चोरी करणे अशा अनेक घटना घडल्या असताना यंत्रणा व व्यवस्था सोयीस्कररित्या दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.
मानवी जीवनाचे व मालमत्तेचे संरक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य असल्याचे मत मागील आठवड्यात अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी दि 11( शुक्रवार ) रोजी असे सावदा येथे वार्षिक तपासणी दरम्यान येथे व्यक्त केले होते. परंतु या वक्तव्याचा विसरच चंद्रकांत गवळी यांना पडलेला दिसतो आहे. त्यामुळे बोलाचा भात आणि बोलाचीच कढी असं तर यंत्रणेचं चालू नाही ना यानिमित्ताने शंका उपस्थित होत आहे.