यावल (सुरेश पाटील)- ओला व सुका कचरा संकलन करण्यासाठी व त्याची विल्हेवाट करण्यासाठी स्वतंत्र कचरा डेपो असताना मात्र संपूर्ण यावल शहरातील घाण कचरा संकलन करून वाहतूक करणारा ठेकेदार हा अंदाजे हजारो क्विंटल वजन असलेला घाण कचरा नगर परिषदेच्या सर्व अटी शर्ती आणि पर्यावरणाचे सर्व नियम खड्ड्यात टाकून चक्क हडकाई नदीपात्रात घाण कचरा टाकून देत असल्याने केंद्र व राज्य सरकारच्या नदी व नाले साफ सफाई करण्याच्या कार्यक्रमास हरताळ फासत असल्याने याबाबत आदरणीय अण्णा हजारे कृत जळगाव जिल्हा भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास व यावल तालुका भीम आर्मी तर्फे कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदारावर विरुद्ध आणि यावल नगरपरिषद मुख्याधिकारी हे जाणून बुजून दुर्लक्ष करून ठेकेदाराला बिल अदा करीत असल्याने त्यांच्या विरुद्ध कड़क कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,संपूर्ण यावल शहरातील गटारीतील व इतर दुर्गंधीयुक्त घाण कचरा संबंधित ठेकेदार नवीन बांधकाम झालेल्या यावल तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या हडकाई नदीपात्रात अंदाजे एक किलोमीटर लांब असलेल्या अंतराच्या नदीपात्रात दुर्गंधीयुक्त घाण कचरा टाकत आहेत विशेष म्हणजे या नदीपात्राच्या आजूबाजूस नागरिकांचा रहिवास आहे,नदीपात्रात दुर्गंधीयुक्त घाण कचरा टाकला जात असल्याने नदीपात्रासह आजूबाजूचा मोठा परिसर मोठ्या प्रमाणात दूषित होणार असल्याने नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.आरोग्यास घातक अशा या सुरू असलेल्या घटनेकडे यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष होत असून ठेकेदारास कोणत्या नियमानुसार आणि का? बिल दिले जात आहे असा प्रश्न उपस्थित होत असून ठेकेदार कोण कोणाला घाण कचऱ्याची टक्केवारी खाऊ घालीत आहे याबाबत सुद्धा यावल शहरात सर्वत्र चर्चा सुरू आहे.
तसेच यावल शहरातील ओला सुका कचरा संकलन करून त्याची वाहतूक करून तो कचरा व्यास मंदिराजवळ स्मशानभूमी पासून काही अंतरावर कचरा डेपोत संकलन करीत आहेत ओला व सुका कचरा वाहतूक करणारा ठेकेदार कशाप्रकारे वाहतूक करीत आहे,कचरा भरलेले एक वाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तोल काट्यावर पुन्हा वजन माप करण्यासाठी कोणत्या प्रकारे आणि कोणाच्या आशीर्वादाने,सहकार्याने वजन मापा साठी जात असतात हे सर्वांना चांगल्या प्रकारे ज्ञात असताना कोणत्या प्रकारची प्रत्यक्ष पडताळणी किंवा खात्री न करता मुख्याधिकारी ठेकेदाराला बिल का?अदा करीत आहे. यासाठी जिल्हाधिकारी जळगाव यांनी यावल नगरपरिषद प्रभारी अधिकारी तथा प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी एक चौकशी समिती नेमून पुढील कडक कारवाई तत्काळ करावी अशी मागणी आदरणीय अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास जळगाव जिल्हा अध्यक्ष तथा पत्रकार सुरेश जगन्नाथ पाटील यांच्यासह भीम आर्मी यावल तालुका अध्यक्ष प्रवीण डांबरे,शहर अध्यक्ष बबलू गजरे,उपाध्यक्ष सचिन पारधे यांनी केली आहे.