साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी अनुपस्थित मतदारांना गृहभेटीद्वारे मतदानाचा अनोखा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ अंतर्गत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात वृद्ध व दिव्यांग मतदारांमध्ये मतदानाचा अलौकिक आनंदासह उत्साह संचारला आहे. चाळीसगाव मतदार संघात ७१ वृद्ध तर १४ दिव्यांग अशा ८५ मतदारांच्या घरी पोहोचले. त्यापैकी ६३ वृद्ध व १३ दिव्यांग अशा ७६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. ८५ पैकी सात मतदार वैद्यकीय उपचारासाठी बाहेरगावी गेले होते. दोन मतदार मतदानापूर्वीच देवाघरी गेल्याचे आढळून आले.
चाळीसगाव शहरातील मालेगाव रस्त्यावरील दिव्यांग मतदार अजिंक्य रवींद्र पाटील यांचे घरी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद स्वतः उपस्थित होते. प्रमोद हिले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार प्रशांत पाटील, निवडणूक नायब तहसीलदार संदेश निकुंभ, नोडल अधिकारी भानुदास शिंदे, अव्वल कारकून संजय पाटील, लिपिक मनीषा पाटील यांनी नियोजन व व्यवस्थापन पाहिले. याकामी तहसीलचे मंडळ अधिकारी, तलाठी यांनी मतदान अधिकारी, सहाय्यक मतदान अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.