शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात ६३ विद्यार्थ्यांचा सहभाग

0
8

शैक्षणिक स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पसरले नवचैतन्य

साईमत/यावल/प्रतिनिधी

येथील सरस्वती विद्या मंदिर, कनिष्ठ महाविद्यालयात शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन शनिवारी, ३० नोव्हेंबर रोजी घेण्यात आले. त्यात ६३ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. सरस्वती विद्या मंदिराच्या शैक्षणिक स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. विज्ञान प्रदर्शन दो गटात भरविण्यात आले. त्यातील पहिला गट हा ६ वी ते ८ वी व दुसरा गट ९ वी ते १० वी साठी होता. अध्यक्षस्थानी संचालक तथा मुख्याध्यापक जी.डी.कुळकर्णी होते.

राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था रवीनगर, नागपूर यांच्या दिशा निर्देशानुसार विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य हेतू शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान असा निश्चित केला होता. सामाजिक पर्यावरणाला अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज घेऊन सात उपविषय विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. अन्न आरोग्य व स्वच्छता, वाहतूक आणि दळणवळण, नैसर्गिक शेती, आपत्ती व्यवस्थापन, गणितीय मॉडलिंग आणि संगणकीय विचार, कचरा व्यवस्थापन, संसाधन व्यवस्थापन अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रकारचे वैज्ञानिक दृष्टीने उत्तम असे वैज्ञानिक उपकरणे सादर केली. त्याचबरोबर उत्तम सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगताना दैनंदिन जीवनातील अनेक घटनांमधील विज्ञान शिकत राहिले पाहिजे. त्यातून अनुभव समृद्ध झाले पाहिजे असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक जी.डी.कुळकर्णी यांनी केले. विज्ञान प्रदर्शनातील लहान गटात प्रथम हिमांशू बावीसे, द्वितीय जगदीश माळी, दुर्गेश चौधरी, तृतीय पूर्वेश झुरकाळे तर मोठ्या गटात प्रथम यश बाविस्कर, द्वितीय विजय महाजन, तृतीय ज्ञानेश्वर बारी आले आहेत.

यावेळी संचालक बी.पी.वैद्य, प्रा एस.एम.जोशी, एन.डी.भारुडे, प्रा. बी.सी.ठाकूर, एस.बी,चंदनकार, एम. एम.गाजरे, ए.बी.शिंदे, नीलिमा पाटील, दीपक पाटील यांच्यासह इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षक ए.एस.सूर्यवंशी, डॉ.नरेंद्र महाले, एस.डी.चौधरी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र महाले तर आभार ए.एस.सूर्यवंशी यांनी मानले.

स्वयंप्रेरणेने विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रदर्शनात सहभाग

शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देत असताना वैज्ञानिक दृष्टीने विद्यार्थी शालेय स्तरावर उपक्रमशीलतेच्या माध्यमातून संधीच्या शोधात असतो. त्याच विचाराने दरवर्षी सातत्याने शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते. त्यातून विद्यार्थी स्वयंप्रेरणेने सहभाग नोंदवितात, असे उपशिक्षक डॉ.नरेंद्र महाले यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here