दोन दिवसांनंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंद, कुटुंबीयांसह गावात चिंतेचे वातावरण
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील गाडोदा (ता. जळगाव) येथील रहिवासी जगन मश्चिंद्र सोनवणे (वय ५५) हे सिव्हिल हॉस्पिटल, जळगाव येथे उपचारासाठी जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले असता ते बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरुवार, १ जानेवारी रोजी रात्री सुमारे ८ वाजेपासून त्यांचा काहीही ठावठिकाणा नसल्याने कुटुंबीयांसह नातेवाईक आणि गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात शनिवारी, ३ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता बेपत्ता असल्याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जगन सोनवणे हे गाडोदा गावात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून, कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारे म्हणून त्यांची ओळख आहे. गुरुवारी रात्री त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाणार असल्याचे घरच्यांना सांगितले होते. त्यानंतर ते घराबाहेर पडले; मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतले नाहीत. सुरुवातीला उशीर होत असावा, असा अंदाज कुटुंबीयांनी बांधला. मात्र वेळ जाऊनही संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी त्यांचा मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरला.
यानंतर नातेवाईक, परिचित तसेच आसपासच्या परिसरात चौकशी करण्यात आली. सिव्हिल हॉस्पिटल परिसरातही शोध घेण्यात आला; मात्र कुठलीही ठोस माहिती मिळाली नाही. अखेर कुटुंबीयांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेत संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार शनिवारी दुपारी बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, संभाव्य मार्ग, रुग्णालय परिसर, सार्वजनिक ठिकाणे तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधकार्य केले जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर करीत आहेत. पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, जगन सोनवणे यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.
दरम्यान, अचानक घडलेल्या या घटनेमुळे सोनवणे कुटुंबीयांवर मानसिक ताण आला असून, गावातही हळहळ व्यक्त केली जात आहे. बेपत्ता व्यक्तीचा लवकरात लवकर शोध लागावा, अशी अपेक्षा कुटुंबीयांसह ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
