साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
येथील मंगळ ग्रह मंदिरात मंगळवारी, ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त ५१ फुटाची ‘महामंगल गुढी’ उभारण्यात आली होती. यावर्षी शहरातील सचिन ड्रेसेसचे संचालक प्रवीण मोरे यांनी सपत्नीक विधीवत गुढीचे पूजन केले. याप्रसंगी मंगल वाद्यासह शंखनाद व श्रीराम नामाचा जयघोष केला. त्यानंतर मंदिर परिसरात दत्त भगवान व अनघा माता यांच्या मंदिराजवळ चौथऱ्याचे भूमिपूजन करण्यात आले. भूमिपूजनाचे जळगावातील भाविक किशोर बोंडे सपत्नीक मानकरी होते. तसेच स्वच्छतागृहाचेही भूमिपूजन करण्यात आले.
शेगाव येथील भाविक विद्याधर महादेव बारद्धे, सदाशिव शामराव बारद्धे, छत्रपती संभाजी नगरातील भाविक सत्यजित वसंतराव देशमुख, शिरपूर येथील भाविक हिरालाल गोविंद चौधरी यांनी भूमिपूजन केले. मंदिराचे पुरोहित जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, गणेश जोशी यांनी पौरोहित्य केले. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डी.ए. सोनवणे, सेवेकरी पुशंद ढाके यांच्यासह भाविक उपस्थित होते.