साईमत, जळगाव : प्रतिनिधी
गेल्या ६ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचशील नगर (तांबापूरा) येथील लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले होते. त्यामुळे घरातील गृहोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना त्वरित मदत मिळण्याची मागणी लावून धरली होती. त्यामुळे त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन पूरग्रस्तांच्या बँकेच्या खात्यात पाच हजाराची रक्कम जमा झाली आहे. उर्वरित दिली जाणारी रक्कमही लवकरच जमा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
येथील सामाजिक कार्यकर्ते असलम काकर आणि विकार खान यांच्या नेतृत्वाखाली शफी शेख, अहेमद खान, अब्दुल बासीत, इस्माईल खान, नियाजोद्दीन शेख यांनी वारंवार मोर्चे काढून तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊन पूरग्रस्तांना कोणत्याही परिस्थितीत मदत मिळालीच पाहिजे, अशी मागणी लावून धरली होती. एवढेच नव्हे तर पंचनामे झाल्यानंतर तहसिलदारांकडेही असलम काकर आणि विकार खान यांनी ६ जुलै २०२३ ते आजतागायत पाठपुरावा सुरुच ठेवला होता. तसेच विधान परिषदेचे आ.एकनाथराव खडसे यांनीही मध्यस्थी केली होती. त्यामुळे अखेर गुरुवारी, ५ ऑक्टोबर रोजी पूरग्रस्तांच्या बँकेच्या खात्यावर पाच हजाराची मदत जमा झाली असल्याचे असलम काकर, विकार खान यांनी सांगितले.