साईमत, अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील रस्त्यांसह विकास कामांसाठी मंत्री अनिल पाटील यांनी नुकताच १० कोटी निधी मंजूर केला असताना आता ग्रामीण भागालाही त्यांनी न्याय देत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून ५ कोटीच्या विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. आता या माध्यमातून ३८ गावांमध्ये आवश्यक ती विकासकामे होणार आहेत.
मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मंत्री अनिल पाटील राज्याची जवाबदारी चांगल्या पद्धतीने सांभाळत असताना आपल्या मतदारसंघास आमदार म्हणून न्याय देण्यासाठी विकासकामांचा सपाटा सुरू केला आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडे विकास कामाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केल्यानंतर नामदार पाटील यांनी यशस्वी प्रयत्न केल्याने सुमारे ५ कोटींच्या कामांना या विभागाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय २४ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला आहे. त्यातील कामांना निधी प्राप्त झाला आहे. निधीतून ग्रामिण भागात, रस्ता काँक्रीटीकरण, सामाजिक सभागृह, संरक्षण भिंत, स्मशानभूमी, पेव्हर ब्लॉक, गटार बांधकाम यासारखी कामे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या परिसरात होणार आहेत.
निधीच्या मंजुरीबद्दल ना.अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार, पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत. संबंधित गावांच्या ग्रामस्थांनी ना.अनिल पाटील यांचे आभार मानले आहेत.