साईमत, नंदुरबार । प्रतिनिधी
दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी यांसारख्या जिल्ह्यातील मालमत्तेच्या गुन्ह्यांचा पोलीस दलाकडून तपास करून तो उघडकीस आल्यानंतर हस्तगत केलेला ४८ लाख रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल व वाहने मूळ मालकांना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांच्या हस्ते परत करण्यात आला. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आगामी सण, उत्सवाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आढावा, गुन्हे आढावा घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे भेट देऊन पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेख, स्वच्छता याबाबत समाधान व्यक्त केले.
नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गहाळ मोबाईलबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी माहिती घेतली असता मोठ्या प्रमाणावर मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यात तक्रारदारांनी मोबाईल हरविल्याबाबत दिलेल्या तक्रारींचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक विश्लेषण शाखेने करून नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात व गुजरात, मध्य प्रदेशात जाऊन त्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आले. हस्तगत करण्यात आलेले सुमारे १२ लाख रुपये किमतीचे १२५ मोबाईल विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या हस्ते मूळ तक्रारदारांपैकी १५ तक्रारदारांना प्रातिनिधिक स्वरूपात सन्मानपूर्वक परत करण्यात आले. हरविलेल्या मोबाईलचा शोध घेऊन ते प्राप्त करून मूळ तक्रारदारांना परत करण्याच्या कामगिरीत नंदुरबार जिल्हा अग्रेसर राहिला आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून उघडकीस आणलेल्या दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी यांसारख्या जिल्ह्यातील मालमत्तेच्या ३० गुन्ह्यांतील ३५ लाख ९७ हजार ३४ रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने, मोटारसायकली, रोख रक्कम व इतर मुद्देमाल तसेच नागरिकांचे गहाळ, हरविलेले १२ लाख रुपये किमतीचे १२० मोबाईल असा सुमारे ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल मूळ तक्रारदारांना परत करण्यात आला.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहादा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, अक्कलकुवा विभागाचे उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह नंदुरबार विभागातील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.