साईमत, बोदवड : प्रतिनिधी
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट शालेय विद्यार्थ्यांनी बघावा. त्यातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा परिचय करून घ्यावा. म्हणून एणगाव येथील जी.डी. ढाके हायस्कुलच्या ४५० विद्यार्थ्यांनी बोदवड शालिमार थिएटरमध्ये जाऊन ‘सत्यशोधक’ चित्रपट बघितला. ‘सत्यशोधक’ हा चित्रपट विद्यार्थ्यांना बघता यावा, यासाठी बोदवड महाविद्यालयातील गणित विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. रुपेश मोरे यांनी तथा बोदवड येथील जनसेवक विनोद पाडर यांनी सर्व साडेचारशे विद्यार्थ्यांच्या सिनेमा तिकिटांचा खर्च उचलला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘सत्यशोधक’ चित्रपट पाहण्याचा अनुभव घेतला.
एणगाव जी.डी. ढाके हायस्कुल येथून बोदवड येथील चित्रपटगृहापर्यंत येण्या-जाण्यासाठी बस गाडी उपलब्ध नव्हती. तेव्हा विद्यार्थ्यांना पूर्णतः मोफत चित्रपट बघता यावा, यासाठी राजपूत जी. जे. राजपूत इंटरनॅशनल स्कुलचे संस्थापक-अध्यक्ष प्रा.सुरेशसिंह राजपूत यांनी त्यांच्या शाळेतील सर्व बसेस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्या. अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन एन.डी. बोंडे तथा सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक डॉ. पुरुषोत्तम गड्डम यांनी प्रा.डॉ. मोरे, जनसेवक विनोद पाडर, प्रा.सुरेशसिंह राजपूत यांचे आभार व्यक्त केले.
‘सत्यशोधक’ चित्रपटात महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्याची संघर्ष गाथा दाखविण्यात आलेली आहे. त्यामुळे चित्रपटाला सर्व वर्गातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट शालेय विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावा, अशी अपेक्षा डॉ. रुपेश मोरे, जनसेवक विनोद पाडर यांनी व्यक्त केली.