नाशिक रोड आरपीएफ कार्यालयातून होणार पाहणी
साईमत/नाशिक/प्रतिनिधी :
आगामी कुंभमेळा लक्षात घेता नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प, इगतपुरी, मनमाड रेल्वे स्थानकावर दर्जात्मक आणि गुणात्मक बदल होत आहे. वाढणारी गर्दी व सुरक्षेचे कारण लक्षात घेता देवळाली कॅम्प रेल्वे स्टेशन येथे सध्या ३८ सीसीटीव्ही बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या सीसीटीव्हीचा रिमोट कंट्रोल नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिस फोर्स कार्यालयात असणार असल्यामुळे नाशिक रोड येथील कर्मचारी थेट देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकाचे २४ तास निरीक्षण करणार आहेत.
आगामी कुंभमेळा लक्षात घेता नाशिक रोड आणि देवळाली कॅम्प हे दोन महत्त्वाचे स्टेशन मानले जातात. विशेष करून देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकामध्ये सैन्य दलातील जवान प्रवास करतात. सैन्यदलाच्या दृष्टीने देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक महत्त्वाचे मानले जाते. या ठिकाणी जवानांचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो. सध्या देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावर ३८ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
संभाव्य गुन्हे घडू नये अथवा गुन्हे शोध पथकाला गुन्हेगारांचे माग काढणे सोयीचे व्हावे या दृष्टीने सध्या देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहे. या सीसीटीव्हीचे रिमोट कंट्रोल आणि मॉनिटर हा नाशिक रोड रेल्वे स्थानकात असणार आहे. आरपीएफ कार्यालयात दोन कर्मचारी यासाठी तैनात असून, स्थानकाचे निरीक्षण हे जवान करणार आहेत.
संशयास्पद व्यक्ती, वस्तू अथवा घटनांचे सूक्ष्म निरीक्षण करून घटना घडण्याच्या पहिलेच माहिती दिली जाणार आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकात सध्या ८६ सीसीटीव्ही कॅमेरे चारही प्लॅटफॉर्मवर बसवण्यात आले आहे. हे कॅमेरे उच्च दर्जाचे असून यातील अनेक कॅमेरे फिरते आहेत. त्यामुळे कॅमेऱ्यामुळे नाशिक रोड रेल्वे स्थानकाची सुरक्षाही अबाधित आहे. येणाऱ्या चार दिवसातच हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, असा अंदाज आरपीएफ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवत आहे. याचा रिमोट कंट्रोल नाशिक रोडला असणार आहे आमचे दोन कर्मचारी २४ तास सीसीटीव्हीचे निरीक्षण करीत असतात. संशयास्पद गोष्टी आढळल्यास लगेच रेल्वे स्थानकात तैनात असणाऱ्या जवानांना माहिती दिली जाते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवत आहोत.
– हरपूलसिंग यादव, रेल्वे पोलीस निरीक्षक, आरपीएफ.