मुंबई : प्रतिनिधी
मुंबई पोलिसाच्या अंमली पदार्थ विभाग घाटकोपर युनिटने ३८ किलोचा गांजा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या गांजाची किंमत ८ लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणी दोन व्यक्तींवर गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
घाटकोपरच्या वैतागवाडी येथील पीडब्ल्यूडी सिमेंट गोडाऊन येथून हे दोन्ही आरोपी गांजाच्या गोणी घेऊन जात होते. त्याच्या संशयित हालचाली पाहून पोलिसांनी त्यांना अडवले चौकशी केली आणि अंग झडतीत त्याच्याजवळ हे अंमली पदार्थ आढळून आले.
तर दुसरीकडे अंमली पदार्थ विभागाच्या आझाद मैदान युनिटने ५ लाख ७० हजाराचे एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आयुब खान असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा धारावीचा राहणारा आहे. आयुबवर तो राहत असलेल्या शाहू नगर पोलिसांच्या हद्दीत मारामारी व इतर गुन्ह्यात सहभागी असल्याचेही गुन्हे आहेत. या प्रकरणी अंमली पदार्थ विभागाचे पोलिस अधिक तपास करत आहेत.