साईमत, नंदुरबार : प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ मंजूर केला आहे. एकाच पदावर प्रशिक्षित पदाच्या शैक्षणिक अर्हतेसह पदवी संपादन करून सलग २४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना निवड श्रेणीसाठी विचार क्षेत्रात घेण्यात येते. प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी मंजूरी कामी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. समितीकडे प्रस्तावित केलेल्या १ हजार ०११ प्रस्तावांपैकी शासन नियमानुसार विहित निकषांची पूर्तता असणारे कागदपत्र प्रस्तावात सादर करणाऱ्या ४०३ पैकी सेवा ज्येष्ठतेनुसार पात्र ठरणारे ३६२ प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी मंजूर करण्यात आली. प्रस्ताव पूर्ण असणाऱ्या मात्र सेवा ज्येष्ठतेत बसत नसलेल्या व कागदपत्र अपूर्ण असणाऱ्या ६४९ प्रस्तावांना तुर्तास मान्यता देण्यात आलेली नाही.
प्रकियेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. जे. तडवी, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सतीश. एस. चौधरी, उपशिक्षणाधिकारी वंदना वळवी, डॉ. युनूस पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी एस.पी. जाधव, सतीश गावित तसेच कनिष्ठ सहाय्यक सुनील गिरी यांनी परिश्रम घेतले.