साईमत/ न्यूज नेटवर्क/अमळनेर :
अमळनेर विधानसभा मतदारसंघात वरूणराजाचे जोरदार आगमनासोबतच मुंबईत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास कामांच्या निधीचीही मतदारसंघात जोरदार बरसात सुरू झाली आहे. मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या प्रयत्नांनी मतदारसंघातील ग्रामीण रस्त्यांसाठी तब्बल २५.८० कोटीचा निधी मंजूर झाला आहे. महत्वपूर्ण रस्त्यांसह काही पुलांचे काम त्यातून मार्गी लागणार आहे. शहरात नवीन रस्त्यांच्या मालिकेमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. त्यात अमळनेर येथील तहसीलदार निवासस्थानाची दुरावस्था झाल्याने अधिकाऱ्यांच्या निवासाची गैरसोय होत असताना निवासस्थान बांधकामासाठी ८० लाख रुपये मंजूर झाल्याने नवे निवासस्थान त्यातून उभे राहणार आहे.
मंत्री अनिल पाटील यांनी सुरवातीपासून शहर व ग्रामीण रस्त्यांच्या नुतनीकरणाकडे अधिक लक्ष दिल्याने बहुसंख्य रस्ते नवीन झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा शहराशी संपर्क वाढून शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसाय करण्यास वाव मिळत आहे. तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्वपूर्ण ग्रामीण रस्त्यांच्या मंजुरीसाठी मंत्री पाटील यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन २५.८० कोटी निधीची बहुसंख्य कामे मंजूर झाले आहेत.
याबद्दल मंत्री अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ना.अजित पवार, ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.