साईमत, जळगाव : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने यंदाची नाशिक विभागीय टेबल टेनिस स्पर्धा जळगावात होणार आहे. जळगाव टेबल टेनिस असोसिएशनतर्फे २३ व २४ सप्टेंबर रोजी स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या हॉलमध्ये पार पडणार आहे. उत्तर महाराष्ट्र विभागीय स्पर्धेत यजमान जळगावसह नाशिक, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार ह्या पाच जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होतील. स्पर्धा आयोजनासंदर्भात रविवारी बैठक घेण्यात आली. यावेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी, कार्याध्यक्ष प्रकाश चौबे, अरविंद देशपांडे, सहसचिव सुनील महाजन, कोषाध्यक्ष संजय शहा, राजु खेडकर, ॲड. विक्रम केसकर, शैलेश जाधव, स्वानंद साने, अमित चौधरी, विजय विसपुते आदी उपस्थित होते.
विजयी खेळाडूंना रोख पारितोषिक, ट्रॉफीसह प्रमाणपत्र देणार
विभागीय स्पर्धेत ११, १३, १५, १७ वर्ष वयोगटातील मुले व मुली तसेच पुरुष व महिला गटाचे सामने खेळविण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना रोख पारितोषिक, ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुक खेळाडूंनी सचिव विवेक आळवणी (मो.९४२२७७४०५५) किंवा स्वानंद साने (मो.९८२३८७९९४३) यांच्याशी जळगाव मेडिकल, जैन मंदिराशेजारी, काँग्रेस भवनसमोर येथे संपर्क साधावा. स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले आहे.