साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील क्रिकेटच्या वादातून झालेल्या मुंबई पोलीस शुभम अनिल आगोणे याच्या निर्घृण हत्येप्रकरणी चार संशयित आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली. आरोपींना न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली आहे. इतर फरार असलेले आरोपी यांना तात्काळ अटक करून शिक्षा द्यावी, यासाठी समाजबांधव एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात येत्या सोमवारी, २२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता आक्रोश मोर्चा करुन रास्ता रोको करणार आहे. मोर्चात विविध मागण्यांचा समावेश असणार आहे.
समाजबांधवांनी केलेल्या मागण्यांमध्ये फरार आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, आरोपीची केस जलद न्यायालयात चालविण्यात यावी, केस चालविण्यासाठी सक्षम सरकारी वकील नेमण्यात यावा, आरोपी हे परंपरागत सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी, आरोपी हे परंपरागत समाजविघातक प्रवृत्तीचे आहेत. तसेच सराईत गुन्हेगार असून त्यांना खटल्यामध्ये फाशीची शिक्षा करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.