पी.एन.दोशी महिला महाविद्यालयाच्या २१ युवती करणार गुवाहाटी ते गेटवे सायकलने प्रवास

0
23

साईमत, मलकापूर : प्रतिनिधी

मातृभूमीचे महत्त्व आणि विविधतेत एकता असा वारसा जपणाऱ्या भारत देशात जनजागृतीचा प्रसार करण्यासाठी श्रीमती पी.एन.दोशी महिला महाविद्यालयाच्या २१ धाडसी युवती २१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत गुवाहाटी ते गेटवे २ हजार ७५१ कि.मी.चा सायकल प्रवास करीत आहेत. युवतींचा हा सायकल प्रवास २६ दिवस सुरु राहणार आहे. एस. पी. आर. जे. कन्याशाळा ही शिक्षणसंस्था महिला शिक्षणाचे कार्य अविरत १०० वर्षे करीत आहे. शतकमहोत्सवी वर्षाचे महत्त्व साधून पी.एन.दोशी महिला महाविद्यालयाच्या महत्त्वाकांक्षी विद्यार्थी, शिक्षक व प्राचार्यांनी चौथे सायकलेथॉन आयोजित केले आहे. दरवर्षी नवनवीन संकल्पनेतून महाविद्यालयाच्यावतीने मुलींसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्यात जनजागृती केली जाते. महाविद्यालयाच्या अनोख्या उपक्रमाचे पालकांसह सर्वच क्षेत्रातून युवतींच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्गातील निवडक मुलींचे प्रशिक्षण यांनी गेल्या दोन महिन्यापासून दर दोन तास कसून सराव करून घेतले जात आहे. खाण्या पिण्याचे पथ्य, रोजच डायटेनिंग सांभाळून त्यांचे फिटनेस पाहून त्यांना प्रवाहात आणले आहे. मोहिमेसाठी मुलींचे मानसिक व शारीरिक तपासणी करून घेऊन त्यांचे समुपदेशन केले आहे. यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.आशा मेनन, दिग्दर्शक डॉ.एस. कुमुधावल्ली, संजय पाटील, ॲड.नलिनी पाटील, मीता ठक्कर, शितल लोखंडे, शिक्षकेत्तर कर्मचारी जयवंत चव्हाण, विजय गुरव, चंद्रकांत घोरपडे, गुलाबसिंह राजपूत आदींनी परिश्रम घेतले आहे.

यापूर्वीही २००६ मध्ये मुंबई ते रत्नागिरी आणि रत्नागिरी ते मुंबई त्याचप्रमाणे २०१६ मध्ये मुंबई ते पुणे आणि पुणे ते मुंबई अशा प्रकारे यशस्वी सायकल मोहीम काढली आहे. सर्वात महत्त्वाची आणि अविस्मरणीय काश्‍मीर ते कन्याकुमारी ही सायकल मोहीम २१ विद्यार्थिनींनी २०१९ साली यशस्वीपणे पार पाडली होती. महाविद्यालयीन युवतींनी आता गुवाहाटी ते गेटवेपर्यंत सायकल प्रवास करून विविधतेत एकता जतन करणाऱ्या अखंड भारताचा संदेश देण्यासाठी सज्ज झाल्या असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. आशा मेनन यांनी सांगितले.

मलकापुरला सहभागी तरुणींचे स्वागत

मलकापूर तहसील चौकात ही रॅली दाखल झाल्यानंतर सायकलोथॉन सहभागी तरुणीचे माजी नगराध्यक्ष ॲड.हरीश रावळ, नगरसेवक अनिल गांधी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तसेच त्यांनी महेश भवनमध्ये त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉ. अरविंद कोलते, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बंडूभाऊ चौधरी, शहराध्यक्ष राजु पाटील, रा.कॉ.चे शहराध्यक्ष अरुण अग्रवाल, माजी नगराध्यक्ष श्‍याम राठी, प्रा.अनिल खर्चे, ॲड.जे डी पाटील, ॲड.अविनाश तांदूळकर, ॲड.परमार, पत्रकार रमेश उमाळकर, हनुमान जगताप, गजानन ठोसर, गजानन सोनवणे, किशोर गणबास आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here