साईमत, शिरपूर : प्रतिनिधी
जागतिक आदिवासी दिनानिमित्त लावण्यात आलेला बॅनर फाडल्याच्या कारणावरुन सांगवी-चारणपाडा येथे संतप्त जमावाने तुफान दगडफेक करत मुंबई-आग्रा महामार्ग अडविला. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दाखल झालेल्या आ.काशिराम पावरा यांच्या वाहनाच्या काचा फोडून जमावाने पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह अन्य पोलिसांवर दगडफेक केली. त्यात सुमारे २० पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाने पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात सुमारे १५० जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर असे की, सांगवी गावातील चारणपाडा येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा देणारा बॅनर लावण्यात आला होता. हा बॅनर अज्ञाताने फाडल्याचे दिसल्यामुळे १० ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजेनंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. सायंकाळी मात्र ग्रामस्थांसह परिसरातील लोकांनी याठिकाणी गर्दी करुन बॅनर फाडल्याचा निषेध करीत धुमाकुळ घातला. सांगवी येथील चारण समाजाच्या लोकांच्या घरांवर तुफान दगडफेक सुरु केली. दिसेल त्या वाहनांचे नुकसान करत जमाव महामार्गावर आला. त्यानंतर रास्तारोको केला. शासकीय कामात अडथळा आणल्याने पोलिसांची कुमक घटनास्थळी पोहचली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करताच संतप्त जमावाने पोलिसांवरच दगडफेक सुरु केली. सापडेल त्या हत्यारासह पोलिसांना मारहाण सुरु झाली. यावेळी घटनास्थळी आ. काशीराम पावरा यांचे वाहन दिसल्याने जमावाने लाठ्या काठ्यांनी त्यांच्या वाहनाच्या काचा फोडून पूर्णपणे नुकसान केले.
पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली
घटनेचे वृत्त कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह शिघ्र कृती दलाची पथके सांगवी येथे दाखल झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना आवश्यक त्या बळाचा वापर करावा लागला. जमावाला पांगविण्यात पोलिसांना रात्री उशिरा यश आले. संपूर्ण रात्रभर बंदोबस्त तैनात करुन पोलिसांनी ही स्थिती नियंत्रणात आणली.
विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अधिकाऱ्यांना सूचना
घटनेची माहिती तातडीने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांना देण्यात आल्याने त्यांनी बंदोबस्तावर असलेल्या अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या. दरम्यान, या धुमश्चक्रीत दोंडाईचा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम पवार, थाळनेर पोलीस ठाण्याचे दीपक पावरा, सोनगीर पोलीस ठाण्याचे गणेश फड यांच्यासह नरेंद्र पवार, कैलास ढोले, रवींद्र राठोड, जयेश भागवत, मुक्तार शाह, विशाल लोंढे, प्रवीण अमृतकर, निखील हटकर, संजय गुजराथी, संजय नटवर, भूषण वाडीले, विजयसिंग पाटील, मनोज नेरकर, पंकज ठाकूर, गोविंद कोळी आणि संदीप ठाकरे हे पोलीस कर्मचारी दगडफेकीत जखमी झाले आहेत. याप्रकरणी संतप्त जमावातील हल्लेखोर संशयित साहेबराव कोकणी, भगवान कोळी, विक्की कोकणी, राजू कोकणी यांच्यासह १५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.