साईमत, जळगाव : प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व (पेट) परीक्षा १२ ते १७ सप्टेंबर या कालावधीत कोणताही तांत्रिक व्यत्यय न येता अत्यंत सुरळीत पार पडल्या. यासाठी ४ हजार ४३७ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ५२७ परीक्षार्थींनी पेट परीक्षा दिली.
विद्यापीठाच्या गणितशास्त्र प्रशाळेच्या इमारतीजवळ ऑनलाईन परीक्षा केंद्रात सकाळी ८ ते सायं. ५.३० या कालावधीत रोज चार बॅचेसमध्ये सहा दिवस परीक्षा घेण्यात आल्या. प्रत्येक बॅचमध्ये १९६ ते २३० विद्यार्थी होते. सहा हॉलमध्ये परीक्षा देण्यासाठी संगणकांची व्यवस्था केली होती. विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचण आल्यास समस्येचे निराकारण करण्यासाठी तंत्रज्ञांची नियुक्ती केली होती. परीक्षेची तांत्रिक जबाबदारी निर्मल सॉफ्टवेअर कंपनीकडे दिली होती. चार विद्याशाखानिहाय ४४ विषयांसाठी ४ हजार ४३७ परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ हजार ५२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. काही दिव्यांग विद्यार्थ्यांनीही परीक्षा दिली. त्यांचीही समाधानकारक व्यवस्था केली. परीक्षेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले. त्या-त्या विद्याशाखेनुसार अधिष्ठाता आणि सहयोगी अधिष्ठाता यांना परीक्षा केंद्रावर निमंत्रित केले होते. यासाठी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र–कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील आदींनी केंद्राला वेळोवेळी भेटी दिल्या.
केंद्र प्रमुख म्हणून प्रा.एस.आर. चौधरी यांच्या समवेत समन्वयक म्हणून प्रा. मनोज पाटील तर तांत्रिक सहाय्य करीता प्रणाली विश्लेषक दाऊदी हुसेन व प्रा. सुरेश कापसे यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी संशोधन विभागाचे सहायक कुलसचिव डॉ. देवेंद्र जगताप यांच्या सोबत विभागाच्या सर्व सहकाऱ्यांनी सहकार्य केले. केंद्रावरील व्यवस्थेबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.