एलसीबीच्या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत
साईमत/जळगाव/प्रतिनिधी :
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी, ८ सप्टेंबर पाळधी येथे एका अवैध जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. छाप्यात पोलिसांनी १६ ‘जुगारीं’ना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून १२ लाख २४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालात रोख रक्कम आणि विविध कंपन्यांचे मोबाईल फोनचा समावेश आहे. एलसीबीच्या कारवाईमुळे अवैध धंद्यांना मोठा चाप बसला आहे. दरम्यान, याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना पाळधी येथील एका अवैध जुगार अड्ड्याबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे त्यांनी तात्काळ एक पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पाळधी येथील शाम कॉलनीमधील एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. छाप्यात पोलिसांनी १६ जणांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून पोलिसांनी ७ हजार २२ हजार २६० रुपये रोख रक्कम आणि ५ लाख २ हजार रुपये किमतीचे मोबाईल फोन असा १२ लाख २४ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात उपनिरीक्षक शरद बागल, पो.हे.कॉ. अक्रम शेख, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, नितीन बाविस्कर, सलीम तडवी, विनोद पाटील, विजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चौधरी, रवींद्र कापडणे, सिद्धेश्वर डापकर, राहुल रगडे, रतन गिते, मयूर निकम, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल भारत पाटील, महेश सोमवंशी आणि प्रमोद ठाकूर यांचा सहभाग होता. कारवाईसाठी पाळधी दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडारे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल धोबी, रवींद्र चौधरी यांनीही सहकार्य केले.