अर्थसंकल्पात तालुक्यातील विकास कामांसाठी १५६ कोटी निधी मंजूर

0
15

साईमत/ न्यूज नेटवर्क/ चाळीसगाव :

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात चाळीसगाव मतदारसंघाला पुन्हा एकदा १५६ कोटी इतका भरीव निधी मिळविण्यात आ.मंगेश चव्हाण यांना यश मिळाले आहे. त्यामुळे त्यांची लक्षवेधी कामगिरी ठरली आहे. विशेषता तालुक्यातील सिंचन, रस्ते, पूल, शासकीय इमारत आदी सर्वच विभागात निधी मिळाल्याने सिंचन क्षमता वाढणार असून दळणवळणाला गती मिळणार आहे. त्यामुळे जनतेतून आनंद व्यक्त होत आहे.

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या वरखेडे लोंढे प्रकल्पाच्या कामाला १०० कोटी, गिरणा धरणावरील पांझण डावा कालवा दुरुस्तीसाठी १९ कोटी ५४ लाख तसेच मन्याड धरणावरील मन्याड उजव्या कालव्याच्या दुरुस्ती कामांना १४ कोटी ५६ लाख असा भरघोस निधी मिळाला आहे. वरखेडे धरणाच्या १०० कोटी निधीचा वापर धरणाच्या बंदिस्त पाईपलाईन काम तसेच तामसवाडी गावाचे पुनर्वसन आदी कामांसाठी करता येणार आहे. यासोबतच पांझण व मन्याड कालव्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने जवळपास दोन आवर्तने कमी होऊन शेवटच्या बांधापर्यंत पाणी पोहोचणे अवघड झाले आहे. त्यामुळे या दोन्ही कालव्यांची ठिकठिकाणी दुरुस्ती, सिमेंट अस्तरीकरण केले जाणार असल्याने शेतकऱ्यांना १ आवर्तन अधिक मिळण्यासाठी मदत होणार आहे. चाळीसगाव तालुक्यातील शेतीक्षेत्राचे सिंचन वाढणार असल्याची माहिती चाळीसगाव मतदारसंघाचे आ. मंगेश चव्हाण यांनी दिली.

इच्छादेवी येथे बनणार नवीन पूल, दोन नवीन रस्त्यांनाही मंजुरी

पातोंडा-मुंदखेडा रस्त्यावर तसेच चाळीसगाव शहरातील हिरापूर रोड ते इच्छादेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तितूर नदीवर अरुंद व कमी उंचीचे पूल असल्याने पूर आल्यावर वाहतूक बंद पडत होती. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी उंच व मोठे पूल बांधण्यात यावेत, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. मात्र, आजवरच्या कोणत्याही लोकप्रतिनिधीला यासाठी निधी मिळविता न आल्याने येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थांचे हाल कायम होते. आ. मंगेश चव्हाण यांनी पातोंडा-मुंदखेडा रस्त्याची दर्जोन्नती करून रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून मान्यता मिळवून दिली. त्यामुळे अर्थसंकल्पात पातोंडा गावाजवळील तितूर नदीवरील पुलाला सात कोटी तसेच इच्छादेवी पुलाला तीन कोटी ५० लाख असा भरीव निधी इतका भरीव निधी मंजूर झाला आहे. यासोबतच चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर पिंप्री ते तळेगाव रस्त्याला एक कोटी २० लाख, पोहरे ते खेडगाव – बहाळ रस्त्याला दोन कोटी, रामनगर – पिंपळवाडी रस्त्यावरील पांझण कालव्यावरील रस्त्यावर नवीन रुंद पूल – एक कोटी, ओढरे गावाजवळ पुलाला एक कोटी ५० लाख असा निधी मंजूर झाला आहे.

६४ मंडळ अधिकाऱ्यांसह तलाठी कार्यालयांना फर्निचर उपलब्ध होणार

चाळीसगाव तालुक्यात सद्यस्थितीत शेकडो कोटींच्या शासकीय इमारती, रस्ते, पूल यांची कामे सुरु आहेत. मात्र, ही कामे ज्या शासकीय यंत्रणेमार्फत सुरु आहेत. त्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चाळीसगाव उपविभागाला प्रशस्त व सोयी सुविधायुक्त इमारत नसल्याने तिथे काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांची गैरसोय होत होती. अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासाठी दोन कोटी १४ लाख निधी मंजूर झाला आहे. यासोबतच तालुक्यातील आठ मंडळ अधिकारी कार्यालय बांधकामासाठी एक कोटी २० लाख निधीची तरतूद केली आहे. मागील काळात आ.मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील ५६ तलाठी सजा यांना स्वता:ची कार्यालय मंजूर करण्यात आली आहे. त्यांची कामेही पूर्ण होत आली आहेत. ५६ तलाठी कार्यालयांसह नवीन आठ मंडळ अधिकारी कार्यालय अश्या ६४ कार्यालयांना फर्निचर उपलब्ध करून देण्यासाठी दोन कोटी निधी मिळाला असल्याचे आ.मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांचे मानले आभार

आपल्या मागणीवरून भरघोस अश्या निधीची तरतूद केल्याबद्दल आ.चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे तसेच महायुती सरकारचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here