जळगाव तालुक्यात खळबळ, नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल
साईमत/ जळगाव /प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून फूस लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २० जानेवारी) सकाळी सुमारे ८ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी रात्री ११ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह जळगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. मंगळवारी सकाळी घरात असताना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून फूस लावली आणि पळवून नेले. काही वेळातच मुलगी घरी नसल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी नातेवाईकांच्या मदतीने तिचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, दिवसभर शोधमोहीम राबवूनही मुलीबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.
अखेर पालकांनी रात्री नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी तपासाला वेग दिला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणे, संभाव्य मार्गांवर शोधमोहीम राबवणे तसेच मुलीच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करीत आहेत. दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीचा शोध घेऊन मुलीचा सुगावा लावावा, अशी मागणी होत आहे.
