शिवसेनेच्या १२ खासदारांची ठाकरेंकडे रोकठोक मागणी शिंदेंशी जुळवून घ्या,अन्यथा…

0
52

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने शिवसेनेसोबत बंडखोरी करून भाजपासोबत (BJP)सरकार स्थापन केलं. शिवसेनेच्या इतिहासातील आतापर्यंतचे हे सर्वात मोठं बंड बोलले जात आहे. शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल ३७ आमदार सहभागी आहेत. यातच आता शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी १२ खासदार देखील वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना खासदारांच्या एका गटाने काल पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या एका केंद्रीय नेत्याने केलेल्या दाव्यानुसार शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडाप्रमाणे खासदारही तीच भूमिका घेऊ शकतात. शिवसेनेच्या १९ पैकी कमीतकमी डजनभर खासदार वेगळी भूमिका घेण्याच्या विचारात आहेत. काल उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (Shivsena) खासदारांची बैठक घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षातील ज्येष्ठ नेत्याने शिंदेंच्या नेतृत्त्वातील बंडखोर आमदारांना पक्षात सामील करुन घेण्याबाबतची विनंती उद्धव ठाकरेंकडे केली. यावर ठाकरेंची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. पण शिवसेनेच्या बैठकीनंतर शिंदेंवर पक्षाकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. त्यामुळे खासदारांनी केलेल्या विनंतीला उद्धव ठाकरेंनी केराची टोपली दाखवल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे शिवसेना खासदारांच्या बैठकीत तीन खासदार अनुपस्थित होते. यात एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे, भावना गवळी आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचा समावेश आहे.

दरम्यान, बंडखोरीचा परिणाम शिवसेनेच्या खासदारांच्या गटावर झालेला नसल्याचा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. उस्मानाबादचे लोकसभा खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही आपण कायमस्वरुपी ठाकरेंसोबत असल्याची ग्वाही दिली आहे. तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसारच १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करू, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here