१०८ रुग्णवाहिका चालक जाणार संपावर : मागण्यांचे निवेदन सादर

0
38

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यात आपत्कालीन मोफत वैद्यकीय आरोग्य सेवा १०८ ही २०१४ पासून सुरु केली आहे. ही रुग्णवाहिका चालविणारे चालक हे २०१४ सालापासून अत्यंत कमी पगारात काम करत आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र रुग्णवाहिका क्रमांक १०८ वाहनचालक संघटनेने आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले होते. मात्र, या विषयावर अद्यापही तोडगा न निघाल्याने महाराष्ट्रातील १०८ रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या चालकांनी बेमुदत संप पुकारला असल्याची माहिती जळगावचे जिल्हाध्यक्ष हिम्मत धनगर यांनी दिली. तसेच चाळीसगावला पत्रकारांशी संवाद साधताना ललीत पाटील यांनी ही माहिती दिली.

बीव्हीजी कंपनीकडून वाहन चालकांनी अत्यंत कमी पगार देत शोषण सुरू असल्याचा आरोप चालकांनी केला होता. याबाबतचे निवेदन वाहनचालकांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना दिले होते. याबाबत काय तोडगा काढण्यात येईल, यावर चर्चा केली होती. त्यानंतर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी २५ जुलै रोजी बीव्हीजी कंपनीचे संबंधित प्रकल्पाचे संचालक, प्रशासकीय अधिकारी आणि वाहनचालक यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. बैठकीमध्ये बीव्हीजी कंपनीने वाहन चालकांसोबत एक बैठक घेत त्यांच्या मागण्याबाबत योग्य विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, महिना उलटूनही वाहनचालकांसोबत कोणतीही चर्चा बीव्हीजी कंपनीने केली नाही.

त्यानंतर ‘१०८ रुग्णवाहिका वाहनचालक संघटने’ने कंपनी सोबत पत्रव्यवहार करत वाहनचालकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात यावे, असे निवेदन कंपनी व्यवस्थापनाला दिले होते. परंतु कंपनी प्रशासनाने रुग्णवाहिका चालकांच्या पत्राला कोणतीही दाद दिली नाही. कंपनीच्या भूमिकेवर संतापलेल्या महाराष्ट्र रुग्णवाहिका १०८ वाहनचालक संघटनेने १ सप्टेंबरपासून बेमुदत काम बंद आंदोलन आणि आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बेमुदत आंदोलनामुळे रुग्णांना त्रास किंवा जीवितहानी झाल्यास त्याला सर्वस्वी बीव्हीजी कंपनी आणि महाराष्ट्र सरकार जबाबदार असणार अशी प्रतिक्रिया जळगाव जिल्हाध्यक्ष हिम्मत धनगर यांनी दिली.

जीवनवाहिनी ठरतेय रुग्णवाहिका

राज्यात नागरिकांच्या २४ तास अत्यावश्यक सेवेसाठी १००० रुग्णवाहिका ही तैनात केल्या आणि १०८ हा हेल्पलाईन नंबरही सुरु केला. शासनाचा हा प्रकल्प भारत विकास ग्रुप अर्थात बीव्हीजी या खासगी कंपनीकडे चालविण्यासाठी दिला आहे. सुरुवातीला काही वर्षे हा प्रकल्प अत्यंत यशस्वी म्हणून समोर आला. रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत असल्याने लाखो रुग्णाचे प्राणही वाचले आहेत. मात्र, ही रुग्णवाहिका चालविणाऱ्या चालकांनी संपाचा इशारा दिल्याने ही रुग्णवाहिका सेवा ठप्प होण्याची भीती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here