भुसावळ : प्रतिनिधी
विरोदा अतिउच्च दाबाच्या वीजकेंद्रातून ३३ केव्ही लाईन काढून त्या परिसरातील ३३/११ केव्ही क्षमतेच्या उपकेंद्रांना जोडण्यात आलेल्या नाही व त्यामुळे सदर परिसरातील शेतकऱ्यांना कमी दाबाचा व वेळोवेळी खंडित होणारा विद्युत पुरवठा होत आहे.यामुळे शेतकऱ्यांचे अति उष्णतेमुळे अतोनात नुकसान होत असून आर्थिक संकटांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.या संदर्भात कृषिमित्र हरिभाऊ जावळे विचार मंचास शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने २२० के.व्ही. विरोदा वीज केंद्रातून यावल, रावेर तालुक्याच्या परिसरातील ३३ केव्ही उपकेंद्रांना वीज पुरवठा उच्च दाबाने करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत, व्यवस्थापकीय संचालक म.ऱाज्य विद्युत वितरण कंपनी आणि विभागातील सर्व अधिकाऱ्यांना कृषिमित्र हरिभाऊ जावळे विचार मंच तर्फे अमोल जावळे यांनी केली आहे.
माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व.हरिभाऊ जावळे यांच्या माध्यमातून सावदा विभागातील यावल, रावेर शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांना योग्य दाबाचा व खंडित वीज पुरवठा होऊन यांच्या शेतीचा विकास घडवून आणण्यासाठी, तसेच सोबत सदर भागात उद्योजकांना सुद्धा चालना मिळून नवीन उद्योग यावे व सोबत घरगुती ग्राहकांना सुद्धा योग्य दाबाचा वीजपुरवठा मिळण्यासाठी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात लोड सेंटर बाबत सखोल अभ्यास करून महापारेषण कंपनी मार्फत अतिउच्च दाबाच्या २२० केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र विरोदा येथे उभारणीसाठी पुढाकार घेतला होता.जागा मिळवून देऊन आवश्यक गोष्टींचा पाठपुरावा स्व.हरिभाऊ जावळेंनी केला होता.त्यासाठी त्याच वेळेस सदर २२० केव्ही वीज केंद्रातून आवश्यक पावर ट्रांसफार्मर २२० केव्ही ते ३३ केव्ही असे बसवून त्यापासून सावदा विभागांतर्गत येत असलेल्या विविध ३३/११ केव्ही उपकेंद्रांना वीजपुरवठा देण्याबाबत योजना आखण्यात आलेली होती व त्यासाठी लागणारी जमीन सुद्धा महापारेषण कंपनीला अधिग्रहीत करून देण्यात आलेली होती.
सदर उपकेंद्र उभारण्याच्या वेळीच करण्यात आलेला विचार म्हणजे यावल रावेर तालुक्यातील परिसरामध्ये पूर्ण दाबाने कृषि पंपांना आणि उद्योगधंद्यांना विज पुरवठा होवून त्यांना चालना मिळण्यास मदत होणे हा उद्देश अद्याप सफल होऊ शकलेला नाही. २२० केव्ही उपकेंद्र ज्याची सध्याची क्षमता ४०० एमव्हिए आहे, त्यातून आवश्यक व निकडीच्या त्या ३३ केव्ही लाईन लवकरात लवकर काढण्यात येऊन यावल रावेर तालुक्यातील तीस केव्ही उपकेंद्रांना त्यांचा विद्युत पुरवठा करण्यात यावा अश्या प्रकारची मागणी अमोल जावळे यांनी केली आहे. शेतकऱ्यांना होणारा त्रास आणि नुकसान बघता अमोल जावळेंच्या मागणीला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.