चाळीसगाव : प्रतिनिधी
धुळ्याहून चाळीसगावकडे येणाऱ्या एका स्कार्पिओ गाडीवर संशय येताच. पाहणी केली असता, त्यात १३ लाख रुपये किंमतीचा ६२ किलो वजनाचा बेकायदेशीर गांजा मिळून आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, चाळीसगाव शहर वाहतूक शाखा व ग्रामीण पोलीस संयुक्तपणे धुळे रोडवरील विराम लॉन्स समोर सोमवार, १८ एप्रिल रोजी संध्याकाळी गस्त घालत असताना त्यावेळी एक विना नंबर असलेल्या पांढऱ्या कलरची स्कार्पिओ गाडी आली. गाडीत उग्र वास आल्याने त्याची अधिक तपासणी केली असता. त्यात बेकायदेशीर विक्रीसाठी जात असलेला १३ लाख ३६ हजार चारशे रुपये किंमतीचा ६२.०६६ किलो वजनाचा गांजा मिळून आला.
त्यावर ग्रामीण पोलीस व शहर वाहतूक शाखांनी सदर मुद्देमाल हस्तगत करून तुषार काटकर (वय-२८ रा. दत्तवाडी ता. चाळीसगाव) व सुनिल बेडीस्कर (वय-३८ रा. पिलखोड ता. चाळीसगाव) या दोघांना ताब्यात घेतले आहे.
सदर कारवाई सोमवार, १८ एप्रिल रोजी धुळे रोडवरील विराम लॉन्स समोर करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण पोलीस धडाकेबाज कामगिरी करीत आहेत. यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे सपोनि तुषार देवरे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.