चंदीगड: वृत्तसंस्था
पंजाबमधील सत्ता जाताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाचही राज्यातील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागितले होते. त्यानुसार सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. हायकमांडच्या इच्छेनुसारच राजीनामा देत असल्याचं सिद्धू यांनी म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं. प्रदेश कमिट्यांचे पुनर्गठन करण्यासाठी हे राजीनामा मागण्यात आल्याचं ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलं होतं. त्यामुळे आता उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडच्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचेही राजीनामे एक दोन दिवसात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करून त्यांनी राजीनामा दिला असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाच्या हायकमांडची जशी इच्छा होती तेच मी केलंय, असं ट्विट करत सिद्धू यांनी आपलं राजीनामा पत्रंही पोस्ट केलं आहे. सिद्धूंना गेल्यावर्षी जुलैमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं होतं. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही सिद्धू यांनी सातत्याने आपल्याच पक्षावर हल्लाबोल सुरू ठेवला होता. त्यानंतर काँग्रेसने चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे सोपवली होती. मात्र, त्यांची ही खेळी काही यशस्वी झाली नाही. चन्नी यांना दोन्ही मतदारसंघात पराभव पत्करावा लागला होता.