जळगाव ः प्रतिनिधी
हजरत बिलाल सोसायटीतर्फे पंचमुखी हनुमान मंदिराजवळ हिंदू-मुस्लिम एकतेसाठी कुस्त्यांची दंगल घेण्यात आली. त्यात खान्देश केसरी, श्री केसरी, चॅम्पियन यांच्या कुस्त्यांच्या दंगल झाल्या. यात 500 मल्लांनी डाव अजमावला. कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक मल्लांनी सहभाग नोंदवला.
त्यात राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते नितीन गवळी, भूषण पाटील, अली पहिलवान (दोघे नाशिक) यांनी विजय प्राप्त केला. तर मुलींच्या कुस्तीत राष्ट्रीय विजेत्या सय्यद आमरीन, श्वेता सोलंकी (दोघे औरंगाबाद) यांनी विजय प्राप्त केला. मुला-मुलींच्या स्पर्धेत राष्ट्रीय विजेता अश्विन सपकाळ (करमाळ, जि. जालना), रेहान पहिलवान (जामनेर), सुनीता महाजन, मौला अली तालिम आदींनी कुस्ती खेळून विजय प्राप्त केला.
दंगलचे उद््घाटन हनुमान व्यायामशाळेचे संचालक दिलीपबापू पाटील यांनी केले. बक्षीस वितरणाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक इब्राहिम पटेल हे होते. बक्षीस वितरण वसीम बापू, शुभांगी बिऱ्हाडे, भागवत भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले. पंच म्हणून दिलीप घुले, विजय वाडकर, संजू पहिलवान, बाबा पहिलवान, याकूब पहिलवान, कालू पहिलवान यांनी काम पाहिल्याचे संस्थाध्यक्ष अकिल पहिलवान यांनी सांगितले. यावेळी अनिल भोळे, दिलीप पाटील, नंदू पाटील, राधेश्याम पांडे, जाफर इनामदार उपस्थित होते.