स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधवांच्या घरी आयकरची धाड

0
16

मुंबई : प्रतिनीधी
ऐन मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या अडचणी वाढताना दिसत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे नेते रडारवर आले आहे. मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर दोनच दिवसात शिवसेनेच्या नेत्याच्या घरावर आणि निकटवर्तीयांकडे आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत.
शिवसेनचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आज सकाळी आयकर विभागाने छापा टाकला. विशेष म्हणजे आयकर विभागाच्या टीमने स्थानिक पोलिसांची मदत न घेता सीईएसएफ या केंद्रीय सुरक्षा यंत्रणेला सोबत घेऊन या धाडी टाकल्या आहेत. शेल कंपन्यांमधील गुंतवणूक, कोविड काळातील भ्रष्टाचाराचे आरोप, जवळपास १५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार आणि हे पैसे युएईकडे वळते केल्याबाबत आयकरकडून जाधव यांची चौकशी करण्यात येत असल्याचे समजते.
मुंबईतील माझगाव भागात असलेल्या त्यांच्या घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु असल्याचे समजते. सध्या त्यांच्या घरात कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार आहेत. जाधव यांच्यासह त्यांच्या निकटवर्गीयांकडेही आयकर विभागाने धाडी टाकल्याची माहिती पुढे आली आहे.
यशवंत जाधवांच्या घरी ईडीने धाड टाकल्याची चर्चा सुरुवातीला होती. मात्र, ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपण ही छापेमारी केली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे ही आयकर विभागाची धाड असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, जानेवारी महिन्यात भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांची मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता. सोबतच आयकर विभागाच्या हाती पुरावे देखील दिले होते. जाधव यांचे पितळ उघडं पाडण्यासाठी आयकर विभागाकडे पाठपुरावा करणार असून त्यांना मदत करणार असल्याचेही सोमय्या म्हणाले होते. ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर जाधव यांच्या घरी छापेमारी झाल्याने शिवसेनेच्या अडचणीत वाढ झाली आहे.
यशवंत जाधव हे १९९७ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे २००७ साली ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले. २००८ साली बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षपदी त्यांच्यी निवड झाली. २०११ नंतर ते शिवसेनेचे उपनेते बनले. तर २०१७ मध्ये महानगरपालिकेत सभागृह नेते म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. यशवंत जाधव यांच्याकडे पाच वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा आहे. जाधवांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेनेचा आणखी एका नेता केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याचं दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here